गावठी कट्यातील गोळीबारात पुन्हा एकाचा खून
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गावठी कट्यातून गोळी लागून प्रदीप एकनाथ पागिरे (वय २५) हा मृत्यूमुखी पडला. गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी संशयावरून गावातील एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अपघात, आत्महत्या, खून अशा सर्व दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. आज सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली .
गुंजाळे परिसरातील गावठी कट्ट्यातून गोळीबारात पंचवीस वर्ष अविवाहित तरुण ठार झाल्याची घटना घडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की खून, की अन्य काही, याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले आहे. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रदीप पागीरे हा युवक गुंजाळे गावातील त्याच्या टेलरिंग दुकानात बसलेला होता. दुकानाच्या पाठीमागील बाजूस त्याचे घर असून हा तरुण आपल्या दुकानामध्ये काम करताना अचानक दुकानामधून गोळीबार झाल्याचा आवाज आला. कुटुंबातील सदस्य दूकानातून आवाज कशाचा आला, हे पाहण्यासाठी गेले असता प्रदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या मित्राने गाडीतून त्यास खासगी रुग्णालयांमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती समजताच पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके ,पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून गावठी कट्टा जप्त केला आहे. घटनास्थळी एक काडतुसाची पुंगळी आढळली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.