अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणूकीत आमदार राजळेंचा विखेना जोरदार शह?
नगर- प्रतिनिधी
भाजप आमदार मोनिकाताई बिनविरोध होताच महाविकास आघाडीला आनंदाचे भरते, विखे गटात सामसुम
अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आजचा आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकेच्या राजकारणात राधाकृष्ण विखे हे एकाकी पडले आहेत. त्यांना महाविकास आघाडीने तसेच भाजपच्या आजी-माजी आमदारांनी घेरले आहे. आज झालेल्या घडामोडीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली.
भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार राजळे यांनी विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
सातवड येथील सेवा सोसायटीच्या संचालक मथुराबाई संभाजी वाघ यांनीही अर्ज दाखल केला होता. दरम्यान, सोमवारी (दि.८) मथुराबाई वाघ यांनी अर्ज मागे घेतल्याने आमदार राजळे यांची बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.वाघ या विखे गटाच्या समर्थक आहेत.
वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने आमदार राजळे समर्थक नाराज झाले होते. वाघ यांनी माघार घ्यावी, यासाठी त्यांची मनधरणी केली जात होती. आज त्याला यश आले.
आमदार राजळे या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भाचेसून आहेत. त्या भाजपच्या असल्या तरी जिल्हा बँकेच्या राजकारणात महाविकास आघाडीसोबत आहेत. भाजपचेच शिवाजीराव कर्डिलेही त्यांच्यासोबत आहेत. वाघ यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच आनंदाचे भरते आले.