पंचनामे पुर्ण होताच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सरकारकडून मदत देणार - राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : शेवगाव व पाथर्डी तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तत्काळ पंचनामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनामे पूर्ण होताच प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सरकारकडून मदत देण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
शेवगाव तालुक्यातील वरुर, भगूर, आखेगाव तर पाथर्डी तालुक्यातील कोरडगावसह परिसरातील नुकसान ग्रस्त गावांना मंत्री तनपुरे यांनी गुरुवारी भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर तनपुरे म्हणाले, ‘सुमारे दोनशे मिलिमीटर पाऊस एकाच रात्री झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे व घरांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला. तर अनेकांच्या घरात पाणी घुसून घराचे देखील मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शेतीबरोबरच बंधारे वाहून गेले. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून ज्यांच्या घरात पाणी साचले. त्या प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ देण्याचे तत्काळ सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्याच बरोबर पिठाच्या गिरण्या सुरू करण्यासाठी व गावातील सिंगल फेज सुरू करण्यासाठी महावितरण सूचना करण्यात आलेले आहेत.