महाराष्ट्र
151074
10
Teacher Recruitment : शिक्षक भरतीसाठी यादीला मिळाला मुहूर्त! 4879 पदांसाठी 7805 उमेदवारांची यादी जाहीर
By Admin
Teacher Recruitment : शिक्षक भरतीसाठी यादीला मिळाला मुहूर्त! 4879 पदांसाठी 7805 उमेदवारांची यादी जाहीर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीसाठी पात्र विद्यार्थ्यांची दुसरी यादी जाहीर करण्याला बहुप्रतिक्षेनंतर मुहूर्त मिळाला आहे. खासगी अनुदानित संस्थांतील ४ हजार ८७९ पदांसाठी ७ हजार ८०५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.
आता संस्थास्तरावर मुलाखतीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यापूर्वीची शिक्षक भरतीची पद्धत मोडीत काढत आता पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा मार्ग निवडला आहे. (list for teacher recruitment has been released for 4879 posts of 7805 candidate )
यावर भरतीसाठी २०२३ पासून प्रक्रिया सुरू असून डी.एड, बी.एड या व्यावसायिक पात्रतेसह अभियोग्यता धारक टीईटी, सीटीईटी या परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या पात्र बेरोजगारांसाठी पहिल्या टप्यात पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषद-१२ हजार ५२२, मनपा-२ हजार ९५१, नगरपालिका-४७७, खासगी शैक्षणिक संस्था- ५ हजार ७२८ अशा एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. यात मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ व मुलाखतीसह ४ हजार ८७९ अशी एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही सुरू आहे.
त्यानुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी गुणवता व आरक्षणानुसार मुलाखतीशिवाय जिल्हा परिषद व पालिकेच्या शाळांत ११ हजार ८५ उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोर्टलवर लाखो विद्यार्थ्यांमधून गुणवत्तायादी जाहीर करत पात्र विद्यार्थ्यांची नावे घोषित झाली आहेत.
मुलाखतीसह पदभरतीमध्ये पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी या गटातील शिक्षकांच्या ४ हजार ८७९ रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील १ हजार ९६ संस्थामधील ४ हजार ८७९ रिक्त पदांसाठी ७ हजार ८०५ उमेदवारांची गुणवतेनुसार निवड केली आहे. त्यांनी निवड केल्यानुसार १० प्राधान्यक्रमाने संस्थासाठी शिफारस करण्यात आली आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी ३० गुणांची तरतूद करण्यात आली आहे.
वाढलेल्या कट ऑफमुळे हिरमोड
पवित्र पोर्टलमार्फत नोकरीसाठी नशीब आजमावणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळांचा पसंती क्रम नोंदविला होता. गेल्या तीन-चार महिन्यांपासून हे विद्यार्थी चातकासारखी यादीची प्रतीक्षा करीत होते. सुमारे पाच हजार जागा असल्याने १:१० या प्रमाणात ५० हजाराच्या आसपास जणांची मुलाखतीसाठी निवड होईल, असा अंदाज होता.
प्रत्यक्षात प्रत्येकाने दहा शाळा निवडल्या असल्याने अवघ्या ७ हजार ८०५ विद्यार्थ्यांचा यादीत संधी मिळाली आहे. यामुळे गुणवत्तेचा कटऑफ वाढून नोकरीची संधी पाहणाऱ्या अनेकांचे स्वप्नभंग झाला आहे. खुल्या प्रवर्गासाठी सरासरी १२०, ओबीसीसाठी ११०, अनुसूचित जाती जमातीसाठी १०० च्या आसपास तर प्रकल्पग्रस्त, एक्ससर्व्हिस मॅन आदी आरक्षणाचा कटऑफ ७५ च्या आसपास राहिला आहे.
वर्गनिहाय रिक्त पदे
पहिली ते पाचवी : १०२४०
सहावी ते आठवी : ८१२७
नववी ते दहावी : २१७६
अकरावी ते बारावी : ११३५
Tags :

