विनापरवाना खत उत्पादन करणाऱ्या गोदामावर छापा, गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासाः बेकायदा खत उत्पादन करणाऱ्या गोदामावर काल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला असून मे. जयकिसान फर्टिलायझर्स अँड केमिकल्सचा मालक आरोपी रणजित भागवत आढाव याच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नेवासा पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रताप रामदास कोपनर यांना माहिती मिळाली होती, की नेवाशातील मे. जयकिसान फर्टिलायझर्स अँड केमिकल्सच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये बेकायदा खतांचा साठा ठेवण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे कोपनर यांच्या समवेत धनंजय एकनाथ हिरवे (तालुका कृषी अधिकारी), ज्ञानदेव किसन गुरगुडे (कृषी
अधिकारी), बाळासाहेब कासार (विस्तार अधिकारी), रखमाजी लांडे (विस्तार अधिकारी), राहुल ठोंबरे (कृषी सहाय्यक), प्रविण देशमुख (कृषी सहाय्यक)
आणि पोलिस कॉन्स्टेबल दिलीप घोळवे यांच्या उपस्थितीत पथकाने या ठिकाणी पाहणी केली.
या ठिकाणी पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. यामध्ये खतांच्या भरलेल्या गोण्या, रिकाम्या गोण्या, शिलाई मशिन, इन्व्हर्टर इत्यादी साहित्य आढळून आले. यावेळी
संबंधितांकडे खत उत्पादनाचा कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले. यावेळी उपस्थित व्यवस्थापकाने फक्त घाऊक खत विक्रीचा परवाना दाखवला. तपासादरम्यान, गोदामात बाहेरून कच्चा माल आणून त्याचे पॅकिंग करून खत विक्रीसाठी तयार करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत विविध तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोदाम पंचासमक्ष मोहोरबंद करण्यात आले असून, आरोपी रणजित भागवत आढाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विकास पाटील करीत असून, हवालदार अजय साठे यांनी घटनास्थळी सहकार्य केले.