महाराष्ट्र
40229
10
विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे-केंद्रप्रमुख - पोळ
By Admin
विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे-केंद्रप्रमुख बाळासाहेब पोळ
आल्हणवाडी शाळेत विज्ञान प्रदर्शन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा
पाथर्डी प्रतिनिधी: दि.२८ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आल्हणवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विज्ञान प्रदर्शन व विविध उपक्रम हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे, विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे काम झाले तरच उद्याच्या भारताचे उज्ज्वल भवितव्य व महासत्ता बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल व शासनाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख श्री बाळासाहेब पोळ यांनी केले.
आल्हणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सरस्वतीच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गव्हाणे, सरपंच परमेश्वर गव्हाणे, उपसरपंच योगिताताई कर्डिले, राधाकिसन कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेचे शिक्षक श्री अरविंद चव्हाण यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडून शाळेतील विविध उपक्रमांची माहिती करून दिली. आल्हणवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर मोरे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. शासनाचा प्रदर्शन भरविण्याचा उद्देश स्पष्ट केला. तसेच त्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
मान्यवरांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनामध्ये पहिली दुसरीचा एक गट व तिसरी चौथीचा दुसरा गट अशा दोन गटामधून अनेक उपकरणाची मांडणी करण्यात आली होती. दिवसभर आल्हणवाडी येथील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन बघण्यासाठी रांगा लावल्या होत्या. या कार्यक्रमानिमित्त माध्यमिक आश्रम शाळेची विद्यार्थिनी कुमारी प्रगती ढवणे हिची इस्त्रोसहलीसाठी निवड झाल्याबद्दल व श्वेता गायकवाड हिने विविध स्तरावर आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून गावाचं नावलौकिक वाढवल्याबद्दल दोघींचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आले. विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच सरपंच परमेश्वर गव्हाणे, उपसरपंच योगिता कर्डिले, माजी सरपंच राधाकिसन कर्डिले, शाळा समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते बाळू सत्रे व बंडू गव्हाणे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला माध्यमिक शाळेचे सी.एम. फुंदे, सुरेश पवार, विठ्ठल गोल्हार, महेश वाघमोडे, गोपाल मोरे, वैशाली आठरे, ज्ञानेश्वर शिरसाट, न्यू इंग्लिश स्कूलचे बाळू फुंदे,सुनील ढोबळे व राऊत, पालक, ग्रामस्थ, आश्रम शाळा व न्यू इंग्लिश स्कूलचे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक जि. प. शाळेच्या शिक्षिका श्रीमती सविता देखणे यांनी तर आभार शिक्षक नेते ज्ञानेश्वर शिरसाट यांनी मानले.
Tags :
40229
10




