महाराष्ट्र
36490
10
एआय–एमएलमुळे ग्रामीण युवकांसमोर करिअरच्या नव्या वाटा खुल्या: राहुल राजळे
By Admin
एआय–एमएलमुळे ग्रामीण युवकांसमोर करिअरच्या नव्या वाटा खुल्या: राहुल राजळे
पाथर्डी सिटी 24 live न्यूज नेटवर्क
आदिनाथनगर (ता. पाथर्डी): येथील दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालयात “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र शिक्षण: उपयोजने, नैतिकता आणि भविष्यातील संधी” या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्र शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.
या वेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा. राहुल राजळे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगार व करिअरच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात या तंत्रज्ञानाचा प्रभाव शिक्षण, आरोग्य, उद्योग, शेती, वित्तीय व्यवहार, भाषांतर, संप्रेषण आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले.पाथर्डी–शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या संकल्पना, त्यांचे विविध क्षेत्रांतील उपयोजन तसेच त्यासंबंधित नैतिक प्रश्न या विषयांवर या चर्चासत्रात सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रासाठी प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक तसेच पदव्युत्तर विद्यार्थी असे एकूण अंदाजे १०० पेक्षा अधिक जणांनी या चर्चासत्रात सहभाग नोंदवला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. टेमकर यांनी दिली.
या राज्यस्तरीय चर्चासत्रात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून डॉ. अशोक साहेबराव म्हस्के, (विभागप्रमुख, गणित विभाग, दादापाटील महाविद्यालय, कर्जत) यांनी “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आयओटी (IoT)” या विषयावर मार्गदर्शन केले. कु. प्राची संग्राम पवार, (प्रमुख, SEED Infotech, अहिल्यानगर) यांनी “नैसर्गिक भाषा प्रक्रिया (Natural Language Processing)” या विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच प्रा. राहुल लक्ष्मणराव पाईकराव, (सहयोगी प्राध्यापक, संगणक अभियांत्रिकी विभाग, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर) यांनी “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विज्ञान : संगणन क्षेत्रातील उदयोन्मुख प्रवाहांचा वेध” या विषयावर विचार मांडले. याशिवाय डॉ. संतोष दत्तात्रय गुजर, (विभागप्रमुख, संगणक शास्त्र विभाग, पी.व्ही.पी. महाविद्यालय, प्रवरानगर) यांनी “AI आणि ML मधील संशोधन प्रवाह : एक उत्क्रांतीवादी दृष्टिकोन” या विषयावर मार्गदर्शन करून उपस्थितांना संशोधनाच्या नव्या दिशा समजावून सांगितल्या.
AI आणि ML च्या वाढत्या वापरामुळे कार्यक्षमता वाढत असली तरी गोपनीयता, डेटा सुरक्षितता आणि रोजगारावर होणारा परिणाम यांसारखे नैतिक प्रश्नही समोर येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा विकास मानवकेंद्रित, पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने होणे आवश्यक असल्यावरही भर देण्यात आला.
या चर्चासत्राच्या माध्यमातून संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या भविष्यातील संधी व नैतिक पैलूंवर सखोल चर्चा घडून आल्याचे निमंत्रक प्रदीप धनवडे आणि डॉ. किशोरकुमार गायकवाड यांनी सांगितले.
या चर्चासत्रासाठी श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. नितीनजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक विक्रम राजळे, विज्ञानशाखा प्रमुख डॉ. जे. एन. नेहुल, कलाशाखा प्रमुख डॉ. एम. एस. तांबोळी, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. एस. जे. देशमुख, संगणकशास्त्र शाखाप्रमुख प्रा. सी. एन. पानसरे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. राजू घोलप व महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. किशोर गायकवाड व प्रा. योगिता इंगळे यांनी केले.
Tags :
36490
10




