सहकारी सेवा संस्थांच्या निवडणुक प्रक्रिया २० सप्टेंबरपासून सुरू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण जाहीर केलेल्या पहिल्या टप्यात नगर जिल्ह्यातील अशोक (श्रीरामपूर), सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे आणि कर्मयोगी कुंडलिकराव जगताप (कुकडी, श्रीगोंदे) सहकारी साखर कारखान्यासह ५८ विविध कार्यकारी सेवासंस्थांची निवडणूक प्रक्रिया २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच नव्याने मतदारयादी तयार करण्यासाठी अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी ३१ ऑगस्ट २०२१ अशी आर्हता तारीख लागू करण्यात आली आहे.
मतदार यादी अंतिम झालेल्या महापालिका व जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थांची मतदार यादी आता पुन्हा नव्याने तयार केली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका दीड वर्षापासून लांबणीवर पडल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह काही सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या, मात्र बहुसंख्य नागरी सहकारी बँका सहकारी पतसंस्था, जिल्हा लेबर फेडरेशनच्या निवडणुका झाल्याच नाही.
यापूर्वी अशोक (श्रीरामपूर), नागवडे व जगताप (कुकडी, श्रीगोंदे) या तीन कारखान्यांच्या मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना मागविल्या गेल्या होत्या. परंतु आता पुन्हा नव्याने या मतदारयाद्या तयार केल्या जातील व त्याला ३१ ऑगस्ट पात्रता तारीख लागू करण्यात आली आहे.
याचबरोबर महापालिका कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी यापूर्वी अंतिम झाली होती. परंतु आता ती पुन्हा नव्याने तयार केली जाणार आहे. दीड वर्षात सभासदांच्या पात्र-अपात्रेत बदल झाला असल्याने नव्याने-मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत.