बनावट एटीएम बनवून पैसे लुटणा-या व्यक्तीला अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बनावट एटीएम कार्डद्वारे नागरिकांच्या खात्यातून परस्पर पैसे लुटणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधाराला अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी ठाणे येथून अटक केली आहे. सुजित राजेंद्र सिंंग (रा. वसई-विरार, ठाणे, मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली.
एटीएम कार्ड क्लोन करून त्याद्वारे वेगवेगळ्या एटीएममधून पैसे काढत एक लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी अहमदनगर येथील भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना एटीएम सेंटर येथील सीसीटीव्ही फुटेजवरून २ आरोपींना अटक करण्यात आली होती. यानंतर धीरज अनिल मिश्रा व सुरज अनिल मिश्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून ३१ बनावट एटीएम कार्ड व २ लाख ६१ हजार ५०० रुपये हस्तगत करण्यात आले होते. तेव्हापासून सुजित हा पसार होता.
सुजित सिंग याला अटक करत त्याच्याकडून लॅपटॉप, ५ मोबाईल हँडसेट, एक संगणक, १७ पेन ड्राईव्ह, एटीएम कार्ड क्लोन करण्यासाठी वापरले जाणारे ४ स्कीमर मशीन, कलर प्रिंटर, ५४ बनावट एटीएम कार्ड, बनावट एटीएम कार्ड करण्यासाठी लागणारे ४६ कोरे कार्ड, ६ विविध कंपन्यांचे सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सुजित राजेंद्र सिंग याच्याविरोधात यापूर्वी अहमदाबाद, सुरत व मुंबई येथे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. अहमदनगरच्या सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, कर्मचारी योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरुण सांगळे, गणेश पाटील, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तेथे सापळा लावला.