सर्पदंश झालेल्या महीलेला सरकारी रुग्णालयात घेण्यासाठी तब्बल ५ तास टाळाटाळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावातील एका महिलेला रविवारी पहाटेच्या सुमारास सर्पदंश झाला. परंतु जिल्हा सरकारी रुग्णालयाने तिच्यावर उपचार करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे या आदिवासी समाजातील महिलेची उपचारासाठी परवड झाली आहे.
पळगाव तलावाच्या कडेला पालात राहणाऱ्या अलका संतोष बर्डे (वय३२) या महिलेला झोपेत सर्पदंश झाला. तिच्या पतीने तात्काळ दुचाकी वरुन जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तिथे कोविडचे कारण सांगून उपचार न करता खासगी रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. खासगी रुग्णालयात गेल्यानंतर प्रथम १० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. हातावर पोट असणाऱ्या या आदिवासी कुटुंबाकडे पैसे नसल्याने दोघेही हतबल झाले. पैशाची सोय होयना अन् सरकारी रुग्णालय दाखल करुन घ्यायना, अशा बिकट परिस्थितीत सापडलेल्या दांपत्याने शेवटी सर्व काही देवावर सोडुन देण्याचे ठरवले. या घटनेची माहिती डोंगरगणचे माजी सरपंच कैलास पटारे, बाळासाहेब पवार, रामदास बर्डे यांना समजताच त्यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला बोलावून सर्पदंश झालेल्या महिलेला जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सुरुवातीला जिल्हा सरकारी रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिल्याने सुमारे ५ तास वाया गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.