तर जनता मोदी सरकार पाडू शकेल.अहमदनगर जिल्ह्यातील या समाजसेवकाचे वक्तव्य
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
‘कोणत्याही पक्षाच्या हाती देशाचे उज्ज्वल भवितव्य नाही. सगळे सत्ता आणि पैशांच्या मागे धावत आहेत. अशा परिस्थितीत जनसंसद मजबूत झाली पाहिजे. या माध्यमातून लोक जागे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारही पाडले जाऊ शकते,’ असे वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.
देशातील १४ राज्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर राळेगणसिद्धीमध्ये झाले. या शिबिरात हजारे बोलत होते. सुमारे ८६ कार्यकर्त्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. यामध्ये जगदीश प्रसाद सोलंकी (दिल्ली), रामपाल जाट (राजस्थान), भोपलसिंग चौधरी (उत्तराखंड), कल्पना इनामदार (मुंबई), योगेंद्र पारीख (राजस्थान), अशोक सब्बन (महाराष्ट्र), दशरथभाई (राजस्थान) अशा प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता.
‘ब्रिटिशांच्या काळात बाहेरचे लोक देशाला लुटत होते. आता आपल्याच लोकांचं सरकार असूनही लुटालूट सुरूच आहे. सर्वच पक्षांचे लोक केवळ सत्ता आणि पैशात गुरफटून गेले आहेत,’ असे सांगत अण्णा हजारे म्हणाले, ‘प्रत्येक सरकार स्वातंत्र्याचा अर्थ जर स्वैराचार असा घेऊन वागत असेल तर जनसंसद एवढी बुलंद झाली पाहिजे की सरकार पाडता आलं पाहिजे. सध्या तरी देशाला वाचवण्याचा तेवढाच पर्याय दिसतो आहे. काँग्रेस असो अगर भाजप कोणत्याच पक्षाकडून देशाचं भवितव्य सुरक्षित वाटत नाही. देशाला वाचवायच असेल तर सरकार कोणत्याही पक्षाचे असो, त्यांच्यावर अंकुश असणारी जनसंसद ताकदवान करण्याची गरज आहे,’ असे सांगतानाच हजारे यांनी दीर्घकालीन नियोजन करून कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
‘काही लोक माझ्यावर जाणीवपूर्वक टीका करतात. मात्र, आपण त्याकडे लक्ष देत नाही. ते माझं कामही नाही. समाज आणि देशासाठी आयुष्य देणे हे माझं काम आहे. सत्य कधीच पराभूत होत नाही, यावर माझा विश्वास आहे. मला कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही देणेघेणे नाही, असेही अण्णा हजारेंनी स्पष्ट केले.