महाराष्ट्र
कत्तलखान्यांवर छापे घालणार्या पोलिसावर गोळीबार!
By Admin
कत्तलखान्यांवर छापे घालणार्या पोलिसावर गोळीबार!
दैवबलवत्तर म्हणून बालंबाल बचावले;
आरोपी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा उंचावणार्या अधिकार्यांमध्ये अग्रक्रमी असलेले श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आज बालंबाल बचावले. मिटकेंचे प्रसंगावधान आणि त्यांचे दैव म्हणून पिस्तुलातून सुटलेली ‘ती’ गोळी जमिनीत घुसली, अन्यथा..! हा थरार आज सकाळी दहाच्या सुमारास राहुरी तालुक्यातील दिग्रस येथे घडला. विशेष म्हणजे गोळी झाडणारा इसम पोलीस दलात सहाय्यक निरीक्षक म्हणून सेवेत असून सध्या निलंबित आहे. व्यक्तिगत कारणातून त्याने ओलीस ठेवलेल्या मुलीची सुटका करण्यासाठी गेलेल्या उपअधीक्षक मिटके यांच्यासोबत झालेल्या झटापटीत त्याने आपल्या पिस्तुलातून गोळी झाडली. मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी ऐनवेळी पिस्तुलाचा बॅरल खाली दाबल्याने सुटलेली गोळी जमिनीत शिरली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. गांधी जयंतीच्या दिनी संगमनेरातील कत्तलखान्यांवर आजवरचा सगळ्यात मोठा छापा पडला होता. त्या छाप्याचे सेनापती उपअधीक्षक संदीप मिटके होते.
जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, त्यातून वाढलेला गुन्हेगारी घटनांचा स्तर यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालेले असतांना खुद्द पोलीस उपअधीक्षकांवरच गोळी झाडण्याच्या प्रकाराने राहुरीतील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था उघड झाली आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच नसल्याने एकामागून एक गुन्हेगार घटनांनी राहुरी चर्चेत येत आहे. आजच्या घटनेत पोलीस अधिकार्यावर गोळी झाडणारा आरोपीही पोलीस अधिकारीच आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य वैशाली नानोर यांच्यासोबतच्या व्यक्तिगत वादातून त्यांच्या राहुरी पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा झाला, त्यावरुन त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
त्याच रागातून ‘तो’ निलंबित सहाय्यक निरीक्षक आज नानोर यांच्या घरी गेला व बंदुकीच्या जोरावर त्याने त्यांच्या लहान मुलीला ओलीस ठेवले. या दरम्यान वैशाली नानोर यांनी त्याची नजर चुकवून आपल्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिल्यानंतर काही वेळातच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी मिटके यांनी आरोपी सहाय्यक निरीक्षकास समजुतीच्या भाषेत समर्पण करण्यास सांगीतले. यावेळी त्याला विश्वासात घेवून त्याच्या हातातील पिस्तुल ताब्यात घेण्याचा मिटकेंचा प्रयत्न सुरु असतानाच आरोपी ट्रिगर दाबण्याच्या विचारात असल्याचे हावभाव त्यांनी हेरले, आणि त्याच क्षणी मिटके यांनी त्याच्यावर झडप घालीत त्याच्या हातातील पिस्तुलाचे बॅरल (पुढचा भाग) खाली दाबला, त्याचवेळी त्यातून गोळी सुटली आणि जमिनीत शिरली. संदीप मिटके यांनी ऐनवेळी आरोपीचे हावभाव हेरुन प्रसंगावधान राखले नसते तर जमिनीत घुसलेली गोळी त्यांच्याच दिशेने येणारी होती. यानंतर मिटकेंसोबत असलेल्या पथकातील कर्मचार्यांनी झडप घालून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सध्या तो राहुरी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
गेल्या काही दिवसांत राहुरीतील कायदा व सुव्यवस्थेचा विषय चव्हाट्यावर आहे. तालुक्याच्या अष्टकोनात फोफावलेले अवैध धंदे, त्यातून वाममार्गाने होणारी लाखोंची उलाढाल, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हाती आलेला बक्कळ पैसा आणि पोलिसांच्या कामात वाढलेला राजकीय हस्तक्षेप यामुळे येथील कायद्याचे अस्तित्वच क्षीण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी नंदकुमार दुधाळसारख्या एका खमक्या पोलीस निरीक्षकाने वर्दीचा सन्मान पुन्हा जागा करुन गुन्हेगारांवर ‘धाक’ निर्माण केला होता. त्यांच्या कार्यकाळात सराईतांनाही गुन्हा करतांना कंप सुटायचा. मात्र त्यांचा राजकीय बळी गेल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या प्रभार्यांना हा भारच अधिक झाल्याने राहुरी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
गांधी जयंतीच्या दिवशी संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांवर राज्यातील आजवरचा सर्वात मोठा छापा पडला होता. अहमदनगर, श्रीरामपूर व संगमनेरच्या जवळपास शंभरावर पोलिसांसह झालेल्या या कारवाईचे सेनापती श्रीरामपूर उपविभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके होते. जिल्हा पोलीस दलात एकामागून अंतर्गत घटनांनी काहूर माजवलेले असताना, भ्रष्टाचाराच्या एक एक घटना समोर येत असताना अगदी इंधन भेसळीपासून ते विखेच्या रेमडेसिविरपर्यंत, आणि नयन तांदळे टोळीच्या उच्चाटणापासून ते संगमनेरच्या गोवंश कत्तलखान्यावरील कारवाईपर्यंत नेत्रदीपक कामगिरी बजावणार्याला पोलीस अधिकार्याला आज साक्षात मृत्यूने हुलकावणी दिली. संगमनेरातील ‘त्या’ कारवाईत उपअधीक्षक मिटकेंनी 71 गोवंशाच्या माना अक्षरशः कसायांच्या कोयत्याखालून सोडवल्या होत्या, त्या मुक्या जीवांचा आशीर्वाद आज त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला.
Tags :
970
10