कै.दगडू नामदेव राठोड यांच्या स्मरणार्थ सुरसवाडी येथे वृक्षारोपण
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील सुरसवाडी येथील रहिवासी व बोरसेवाडी चे माजी सरपंच लक्ष्मणशेठ राठोड यांच्या वडिलांचे नुकतेच वृद्धापकाळाने १०० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांसाठी त्यांनी खुले हौदाचे बांधकाम केले व सुरसवाडीतील त्यांचे स्मृतीस्थळी वृक्षारोपण करण्यात आले.
सुरसवाडी येथील एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले दगडू राठोड हे स्वभावाने अतिशय शांत, मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांना पशू पालन व निसर्गातील प्राणी, पक्षी यांची खूप आवड होती. त्यांच्या जाण्याने समाजात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना पत्नी, दोन मुले, ५ मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे थोरले चिरंजीव बबन दगडू राठोड (प्रशासकीय अधि.न.पा. शेवगाव) तर धाकटे चिरंजीव लक्ष्मण दगडू राठोड (माजी सरपंच ग्रा.पं.बोरसेवाडी) हे एक नामवंत चारकोल व्यापारी आहेत.
आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे भव्य असे स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे.
सुरसवाडी सारख्या डोंगराळ भागात फेब्रु/मार्च महिन्यापासूनच पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागते. 'ग्रामस्थांची पाणीविषयक महत्वाची गरज लक्षात घेऊन तसेच प्राणी,पक्षी,वन्यजीव यांना पाणी पिऊन त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, या उदात्त हेतूने या स्मृती स्थळी खुले हौद बांधण्यात आले आहे तसेच याठिकाणी विविध फळांची व शोभेची झाडे लावून हे स्मृतीस्थळ सुशोभित करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.
या कामी कै. दगडू राठोड यांचे नातू गणेश बबन राठोड ( बीएसटी कंडक्टर),सचिन बबन राठोड (मुंबई पोलीस), किरण लक्ष्मण राठोड (सदस्य ग्रा.पं.बोरसेवाडी)यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचे महान कार्य राठोड परिवाराने केले आहे.
यावेळी संत सेवालाल वनराईचे निर्माते विठ्ठल पवार पवारतांडा, सुरसवाडीतील ग्रामस्थ, महिला, बालगोपाळ आदी उपस्थित होते.