पाथर्डी तालुक्यात 'या' गावात पालखी सोहळ्यात पोलिसांना धक्काबुक्की
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : मोहटादेवीच्या पालखी सोहळ्याच्या वेळी पोलिसांना धक्काबुकी करण्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन आरोपींसह इतर दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तीविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शनिवारी (१६ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मोहटे गावात ही घटना घडली आहे.
मोहटादेवी गडावरील शारदीय नवरात्र उत्सव संपल्यानंतर मोहटादेवीची मोहटे गाव ते देवीगड अशी मिरवणूक काढण्यात येत असते. त्या प्रमाणे शनिवारी रात्री ही मिरवणूक काढण्यास सुरवात झाली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता. यावेळी सुहास चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, प्रवीण पाटील हे मोहटादेवी गड पायथ्याला फौजफाटा घेऊन गेले असता त्या ठिकाणी जवळपास १०० जन बँडच्या तालावर नाचत होते. यावेळी चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला असल्याची माहिती देत लोकांना निघून जाण्याचे आवाहन केले. त्यावेळी महादेव आसाराम दहिफळे व विठ्ठल आसाराम दहिफळे यांनी चव्हाण व इतर पोलिस कर्मचाऱ्यांना आम्ही येथून जाणार नाही, व कोणालाही जाऊ देणार नाही, असे म्हणून चव्हाण व इतर पोलिस कर्मचाऱ्यांशी झटापट केली. यावेळी पोलिसांनी महादेव दहिफळे यास पकडून ठेवले मात्र घटनास्थळी जमलेल्या इतर दहा ते पंधरा व्यक्तीने विठ्ठ्ल दहिफळे यास पळून जाण्यास मदत केल्याने तो पळून गेला. याप्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून महादेव दहिफळे व विठ्ठल दहिफळे यांच्यासह घटनास्थळी उपस्थित असलेल्या दहा ते पंधरा आरोपी विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.