महाराष्ट्र
आयुष्याचा अंतिम हेतू समाधान हाच आहे – डॉ. संजय कळमकर
By Admin
आयुष्याचा अंतिम हेतू समाधान हाच आहे – डॉ. संजय कळमकर
पाथर्डी प्रतिनिधी:
आज मिडीयाच्या भावविश्वात, जगभर सर्वकाही आलबेल सुरु आहे, असे आभासी चित्र निर्माण केले जात आहे. या आभासी जगात किती रममाण व्हावे हे प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवले पाहिजे. तुमच वय आभासी जगात वावरण्याच नाही तर आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचं आहे.
आज मिडिया नको त्या गोष्टीला आवास्तव महत्व देत असून सेलिब्रिटी पुत्रांच्या गोरखधंद्याना २४ तास प्रसिद्धी देत आहेत. अशा या आभासी जगातून विद्यार्थ्यांनी लवकर बाहेर याव. दिसण्यात काही नसतं तर असण्यातच सर्व काही असतं म्हणून आपले हरवलेले चेहरे प्रफुल्लित करून विनोदाचा आस्वाद घ्या. विनोद आपल्याला आपले दुख विसरण्यास मदत करते. साहित्याची आवड नसणारा माणूस निरस असून कुठलीही कला आपल्याभोवती आनंदाच कवच तयार करत असते. कलेच्या क्षेत्रात जा, निश्चितच आनंद मिळेल. आपण कला निर्माण करू शकत नसाल तर किमान कलेचा आस्वाद घ्या, कारण आयुष्याचा अंतिम हेतू समाधान हाच आहे आणि हे समाधान फक्त कला देऊ शकते, असे प्रतिपादन प्रख्यात विनोदी साहित्यिक व हास्यसम्राट फेम डॉ. संजय कळमकर यांनी केले.
ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात वाङमय मंडळ उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे तर व्यासपीठावर साहित्यिक मधुकर मैड, डॉ. सुभाष शेकडे, डॉ. बबन चौरे, डॉ. अशोक डोळस, पोपट फुंदे, अनुराधा फुंदे आदी उपस्थित होते.
डॉ. कळमकर विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने आपली क्षमता ओळखून आपले करियर निश्चित करावे. आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी न करता आपण प्रवेश घेतलेली कोणतीही शाखा कमी दर्जाची नाही, ही खुणगाठ मनाशी बाळगून प्रामाणिक प्रयत्न करावे. कोणत्याही किरकोळ गोष्टीवर नाराज न होता आपले अंतर्मन कायम जागे ठेवा व कोणताही निर्णय घेताना अंतर्मनाचे ऐका, कारण बाह्यमन कायम आभासी जगात वावरत असते. यावेळी म. गांधी जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागामार्फत घेतलेल्या सामान्यज्ञान व पत्रलेखन स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. सुभाष शेकडे, सुत्रसंचालन डॉ. बबन चौरे व प्रा. देवेंद्र कराड तर आभार प्रा. वैशाली आहेर यांनी मानले.
Tags :
193
10