रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहनाला ताशी पन्नास रुपये दंड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कोणत्याही किरकोळ अपघातामध्ये पंचनामा झाल्यानंतर वाहन तत्काळ मालकाला द्यावे. किरकोळ अपघातामधील वाहने पोलिस ठाण्यात आणू नयेत. ज्या अपघातात कोणी ठार झाले असेल, असे अपघात, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना वाहनांची तपासणी करावयाची असेल, तरच ती पोलिस ठाण्यात आणावीत. तपासणी झाल्यानंतर ही वाहने मालकांकडे सुपूर्द करावीत. अपघातग्रस्त वाहनांच्या मालकांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते. त्यामुळे मालक अशी वाहने घेऊन जाण्याचे टाळतात. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत अशा स्वरूपाची हजारो वाहने पडून आहेत. या वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे.
अपघात झाल्यानंतर अनेकदा अपघातग्रस्त वाहन रस्त्यावर अनेक दिवस पडलेले असते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. तसेच अपघातही होतात. त्यामुळे अपघात झालेली ही वाहने रस्त्यावरून पंचनामा झाल्यानंतर न हटविल्यास मालकांकडून ५० रुपये तास, असा दंड वसूल केला जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वाहनांमुळे पोलिस ठाण्यांना बकाल स्वरूप आले आहे. काही वेळा अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला पडून राहतात. पंचनामा झाल्यानंतर मालकांनी ही वाहने घेऊन जावीत, अन्यथा मालकांना प्रतितास ५० रुपयांप्रमाणे दंड आकारला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था गंगामाता वाहन संशोधन संस्था बेवारस वाहने ओळखण्यासाठी मदत करीत आहे. या संस्थेच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या आवारातील बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेतला जात आहे.
मनोज पाटील, पोलिस अधीक्षक