महाराष्ट्र
113574
10
अहिल्याने कॅन्सरग्रस्तांसाठी केले केसदान - सत्यजित तांबे यांच्या आठ वर्षीय लेकीचं स्तुत्य पाऊल
By Admin
अहिल्याने कॅन्सरग्रस्तांसाठी केले केसदान - सत्यजित तांबे यांच्या आठ वर्षीय लेकीचं स्तुत्य पाऊल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कॅन्सरचे उपचार घेत असलेल्या व्यक्तींमध्ये किमोथेरेपी दरम्यान केस गळणे किंवा अलोपेसियाचा त्रास होणे ही बाब रुग्णांचं मानसिक खच्चीकरण करणारी असते. मात्र या रुग्णांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण होऊन या आजारावर मात करता येईल यासाठी अनेक लोक आपापल्या पध्दतीने प्रयत्न करीत असतात.
त्यातच आता शिक्षण क्षेत्रात काम करणार्या डॉ. मैथिली व सामाजिक- राजकीय क्षेत्रात काम करणारे सत्यजीत तांबे यांच्या अवघ्या आठ वर्षांची कन्या अहिल्या हिने स्वयंस्फूर्तीने या रुग्णांच्या केसरोपणासाठी आपले केस कापून या रुग्णांकरता दिले आहेत.
सध्याची आहार आणि अनियमित जीवनशैली यामुळे कॅन्सरचे प्रमाण सर्वत्र वाढले आहे. या आजाराच्या उपचारादरम्यान होणार्या किमोथेरपींमधून रुग्णांच्या डोक्यावरील केस हे पूर्णपणे गळून जातात. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये प्रचंड निराशा निर्माण होऊन हा आजार त्यांना क्लेशदायक वाटू लागतो. कॅन्सरवर वेळीच उपचार केल्यास तो नियंत्रित करण्यात येतो. याचबरोबर अनेक रुग्णांवर केस रोपण करून त्यांना पूर्वस्थितीतील जीवन अनुभवता येते. त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या मानसिक स्थितीवरही होत असतो. तसंच मानसिक स्थिती चांगली राहिल्याने रुग्ण उपचारांनाही उत्तम प्रतिसाद देतात.
अशा रुग्णांचे काही व्हिडीओ इयत्ता दुसरीत शिकणार्या चिमुकल्या अहिल्याने पाहिले. बर्याच दिवसांपासून ती त्याबाबत चिंताक्रांत होती. अत्यंत संवेदनशीलपणे तिने या रुग्णांना आपण काय मदत करू शकतो, याचा विचार केला. अहिल्याने ग्रेटा थनबर्ग आणि मलाला युसुफझाई यांची कहाणी तिच्या आजीकडून म्हणजेच संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्याकडून ऐकली होती. ग्रेटाने ज्याप्रकारे पर्यावरण रक्षणासाठी लढा सुरू केला आहे किंवा मलालाने वयाच्या 11 व्या वर्षी तालिबान्यांसमोर न झुकता शिक्षणाचा निर्धार कायम ठेवला त्यातून प्रेरणा घेऊन खेळण्या – बागडण्याच्या वयात अहिल्याने स्वत:हून हे केस देण्याचा निर्णय घेतला.
एवढ्या लहान वयात अशी समज दाखवणं हेच कौतुकास्पद आहे. त्याच बरोबर कॅन्सरग्रस्त रुग्णांना त्यामुळे या आजाराविरोधात लढण्यासाठी ताकदही मिळेल. अहिल्याच्या रुग्णांप्रती असलेल्या आत्मीयतेचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.
Tags :

