गोळीबार प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आरोपीचा शोध सुरू
By Admin
गोळीबार प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आरोपीचा शोध सुरू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा शहराजवळील आहिल्यानगर प्रभागात तहसीलदार निवासापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या शुक्रवारी (दि.15) सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या गोळीबारप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध मारहाण व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल चव्हाण (रा. गंगानगर, नेवासा), मयूर वाघ व ज्ञानेश्वर दहातोंडे दोघे (रा. नेवासा फाटा) व एक अनोळखी अशी आरोपींची नावे आहेत. घटनास्थळी तीनदा गोळीबार झाला. मात्र, यामध्ये अमोल शेलार हा बालंबाल बचावला. नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांनी कर्मचार्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली.
घटनास्थळावरून दोन उडालेल्या गोळ्यांच्या कॅप व एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले. त्याठिकाणी तीन ते चार प्रत्यक्षदर्शींचे जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात आले. या गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. याबाबत आकाश पोपट कुसळकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास त्याचा मित्र अमोल भास्कर शेलार हा स्कुटी धुण्यासाठी त्याच्या दुकानात आला होता.
त्याच्या पाठोपाठ दोन मोटारसायकलवर अनिल चव्हाण, मयूर वाघ, ज्ञानेश्वर दहातोंडे व अन्य एक तरूण असे चौघे जण आले. अनिल चव्हाणने अमोल शेलारला तू लई माजलास, तुझा आज काटाच काढतो असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी सुरू केली. त्यामुळे आपण शिवीगाळ करू नको म्हटल्याने त्याने आपल्या कपाळावर बियरची बाटली मारून जखमी केले.
तसेच, शेलारच्याही डोक्यात बियरची बाटली मारली. त्यानंतर शेलारने नेवासा फाट्याच्या दिशेने पळ काढला. त्याच्या पाठीमागे लाकडी दांडा घेऊन ज्ञानेश्वर दहातोंडे पळाला. तर, मयूर वाघ याने त्याच्या जवळील गावठी कट्ट्यातून हवेत फायर केले. तसेच, शेलारच्या दिशेने दोन फायर केले. परंतु, त्यास गोळी लागली नाही. अनोळखी तरूण गाड्यां जवळच उभा होता.
गोळीबाराचा आवाज झाल्याने नागरिकांची गर्दी होत असल्याने या चौघांनी नेवाशाच्या दिशेने पलायन केल्याचे कुसळकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा व आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजय करे तपास करीत आहेत. डोक्यात दारुची बाटली फोडल्याने कुसळकर व शेलार हे दोघे जखमी झाले आहेत. हा प्रकार नेमका कशावरुन झाला, याचे निश्चित कारण समजू शकले नाही. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा, असे नागरिक सांगत आहेत.
आरोपींचा लवकरच शोध लागेल
या गोळीबारप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. लवकरच आरोपी गजाआड होतील, अशा विश्वास पोलिस निरीक्षक विजय करे यांनी व्यक्त केला आहे.
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)