मोबदला द्या, अन्यथा आंदोलन; महामार्गात जमीनी गेलेले शेतकरी आक्रमक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातून जाणार्या पैठण – पंढरपूर व खरवंडी कासार – लोहा राष्ट्रीय महामार्गातील शेतकर्यांच्या जमिनीचा आर्थिक मोबदला व अन्य अडचणी त्वरित सोडवाव्यात, अन्यथा प्रांतधिकार्यांच्या कार्यालयावर घंटानाद व बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा भालगावच्या माजी सरपंच अंकुश कासोळे व शेतकरी ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी तहसीलदार श्याम वाडकर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले की, पैठण -पंढरपूर, खरवंडी कासार – लोहा या दोन महामार्गाच्या कामात तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या जमिनी संपादीत झाल्या आहेत. रस्त्याचे काम अंतिम टप्यात आले असून, शेतकर्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. रस्त्याच्या कडेला खोदकाम झाले नसल्याने पावसाच्या पाण्याने शेतीचे नुकसान झाले आहे. मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात या संदर्भात उकांडा फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी हा प्रश्न सोडवण्याचे आपण आश्वासित केले होते; मात्र तेंव्हापासून आजपर्यंत कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक व संबधित विभागाने केलेली नाही.
कार्यालयात माहिती घेण्यासाठी शेतकरी आल्यास वेळोवेळी चुकीचे उत्तरे दिली जातात. कार्यालयातील कर्मचारी शेतकर्यांना उध्दटपणे बोलतात. शेतकर्यांची अडवणूक करतात. हा प्रश्न शासनाने दखल घेऊन तत्काळ मार्गी लावावा, अन्यथा 10 ऑगस्टला प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन व बैठा सत्याग्रह केला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील खरवंडी, भालगाव, मिडसांगवी, मुंगुसवाडे परिसरातील ग्रामस्थ निवेदन देताना उपस्थित होते. प्रवीण खेडकर, विष्णू थोरात, गणेश सुपेकर, रमेश सुपेकर, सुभाष खेडकर, बाबासाहेब खेडकर, दत्ता सुपेकर, अशोक खेडकर, दादासाहेब खेडकर आदींच्या निवेदनावरती स्वाक्षर्या आहेत.