रेशनकार्डवर आता मका-ज्वारी मिळणार
By Admin
रेशन कार्डवर आता मका-ज्वारी मिळणार
अहमदनगर- प्रतिनिधी
स्वस्त धान्य दुकानावर (रेशन) आता गव्हासोबत मका आणि ज्वारीही मिळणार आहे. जिल्हयात शेतकऱ्यांकडून शासनाने मका मोठ्या प्रमाणावर खरेदी केला आहे. तोच मका स्वस्त धान्य दुकानांवरून लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. तसेच धुळे-जळगाव जिल्ह्यातील ज्वारी शेवगाव आणि नेवासा या दोन तालुक्यांंमधील लाभार्थ्यांना मिळणार आहे. जिल्हयात रेशनवर ज्वारी प्रथमच मिळणार आहे.
यंदा जिल्हयात मक्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे शासनाने मक्याची खरेदी केली होती. जिल्हयात खरेदी केलेला मका जिल्हयातच वाटप केला जाणार आहे. त्यामुळे रेशनवरून दिला जाणारा गहू कमी करण्यात आला आहे. एका लाभार्थ्याला ३५ किलोचे धान्य दिले जाते.
त्यामध्ये तांदुळ १० किलो, गहू २५ किलो दिला जायचा. आता गहू पाच किलो आणि मका २० किलो दिला जाणार आहे. तांदळाचे वाटप पूर्वीप्रमाणेच १० किलो असेल. शेवगाव-नेवासा तालुक्यात अंत्योदयच्या लाभार्थ्यांना १३ किलो गहू व १२ किलो ज्वारी, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना ज्वारी व गहू प्रत्येकी दोन किलो दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.
असे वाटप होईल मका- ज्वारी-गहू-तांदुळ
शेवगाव, नेवासा या दोनच तालुक्यांमध्ये ज्वारीचे वाटप होणार आहे. धुळे-जळगावकडून येणारी ज्वारी वाहतूक खर्चाच्या दृष्टिने सर्वात जवळच्या या दोन तालुक्यात वाटप केली जाणार आहे. कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी या तालुक्यांमध्ये मक्याचे वाटप होणार आहे. मका मिळणाऱ्या या तालुक्यात अंत्योदयच्या लाभार्थ्यांचा गहू कमी करण्यात आला असून तिथे ५ किलो गहू आणि २० किलो मका मिळणार आहे. तर प्राधान्य कुटुंभ लाभार्थ्यांना १ किलो गहू, २ किलो ज्वारी, २ किलो तांदुळ असे मिळणार आहे. मका वाटप होणार नाही, अशा अकोले, संगमनेर, राहुरी, पारनेर, नगर शहरात अंत्योदयच्या लाभार्थ्यांना २५ किलो गहू आणि १० किलो तांदुळ मिळणार आहे.
दरमहा लागणारे धान्य (कंसात दर)
गहू- १० हजार मे. टन (२ रुपये किलो)
मका-४५ हजार क्विंटल (१ रुपये किलो)
तांदुळ- ७ हजार मे. टन (३ रुपये किलो)
ज्वारी-९२५ मे. टन (१ रुपये किलो)
असे आहेत लाभार्थी
अंत्योदय योजना कार्ड- ८८६१८
प्राधान्य कुटुंब लाभार्थी-६,०५,५२४
एकूण- ६, ९४, १४२