शेवगाव- विषबाधा प्रकरण मृतांचा व्हिसेरा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील विषबाधाप्रकरणी शवविच्छेदनानंतर दोघांचाही व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, तो तपासणीसाठी नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे शेवगाव पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, त्यांच्यासोबत असलेले चौघे मित्र चार दिवसांनंतरही पोलिसांना मिळाले नसल्याने त्यांचा अद्याप शोध सुरूच आहे.
वैभव आबासाहेब बिडकर (वय 28, रा. आखेगाव, ता. शेवगाव) व कृष्णा बबन काकडे (वय 30, रा. सोमठाणे, ता. पाथर्डी) अशी मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कपाशीवर औषध फवारणी केल्यानंतर विषबाधा होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 22) सायंकाळी घडली होती. याबाबत शेवगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी शेवगाव तालुक्यातील आखेगाव परिसरातील दोन मजुरांनी कपाशीवर औषध फवारणी केली. त्यांच्यासोबत त्यांचे इतर चौघे मित्र तेथे उपस्थित होते.
कपाशीवर औषध फवारणी केल्यानंतर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हे सहाजण सोमठाणे शिवारातील एका शेतात बसले होते. यानंतर तेथे दोघे मृत अवस्थेत सापडले, तर चौघे बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. शवविच्छेदनात हे मृत्यू विषबाधेने झाले असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. मात्र, व्हिसेरा अहवाल व इतर चौघे मित्र सापडल्यानंतरच खरी काय घटना घडली, याचा उलगडा होणार असल्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी सांगितले.