माजी विश्वस्तासह पंडित पोलीस कोठडीत
अहमदनगर- प्रतिनिधी
अंधश्रद्धेतून मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी शुक्रवारी सोलापूर येथील पंडित प्रदीप जाधव व मोहटादेवी स्ट्रस्टचा तत्कालीन विश्वस्त संदीप पालवे यांना अटक केली. या दोघांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. मंदिरात सुवर्णयंत्रे पुरण्याबाबत मोहटा देवी ट्रस्टच्या विश्वस्तांनी ठराव करून सोलापूर येथील पंडित प्रदीप जाधव याला मजुरी म्हणून २४ लाख ८५ हजार रुपये व १ किलो ८९० ग्रॅम सोने विनानिविदा दिले होते. त्यामुळे या प्रक्रियेत जाधव याची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
न्यायालयात सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. शिवाजी दराडे यांनी बाजू मांडत आरोपींना जास्तीतजास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. सरकारी पक्ष व आरोपी पक्षाच्यावतीने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीश अस्मिता वानखेडे यांनी या दोघांना १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान या गुन्ह्यात इतर आरोपींचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.