पाथर्डी- बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठे वय सांगून विवाह केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बनावट कागदपत्रे तयार करून 21 वर्ष वय पूर्ण नसतानाही 21 वर्ष वय पूर्ण असल्याचे सांगून विवाह केल्याप्रकरणी पती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार 6 एप्रिल 2022 रोजी अगस्ती मंगल कार्यालय आळंदी येथे घडला.
अनिल विश्वास आल्हाट (रा. वाघोली, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गौतम विश्वनाथ शिरसाट (वय 43, रा. पिंपळगाव टप्पा, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांनी बुधवारी (दि. 18) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल याचे वय 21 वर्ष पूर्ण नाही, असे असतानाही त्याने बनावट कागदपत्रे तयार केली. त्यामध्ये त्याचे वय 21 वर्ष पूर्ण असल्याचे दाखवले. त्याआधारे फिर्यादी आणि त्यांच्या मुलीची फसवणूक करून फिर्यादी यांच्या मुलीसोबत विवाह केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.