साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, कार्यक्षेत्रातील उसाचे प्राधान्याने गाळप करण्याची यांंनी केली मागणी
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना ज्ञानेश्वर, वृध्देश्वर व केदारेश्वर या तिन्ही सहकारी कारखान्यांनी ऊस दर जाहीर करून, कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने गाळप करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत वंचितचेे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार छगन वाघ यांना निवेदन देण्यात आले. गतवर्षी कारखानदारांनी बाहेरील ऊस कमी भावात आणल्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांचे मोठे हाल झाले. ऊस तोडणीसाठी शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड सोसून मानसिक त्रास सहन करावा लागला.
या सर्व प्रकाराला शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील तिन्ही कारखान्यातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी प्राधान्य द्यावे. जोपर्यंत कार्यक्षेत्रातील ऊस शिल्लक आहे, तोपर्यंत बाहेरील ऊस गाळपासाठी आणू नये. ऊस दर व कार्यक्षेत्रातील ऊसासंदर्भात तहसीलदार वाघ यांनी तिन्ही कारखाना प्रशासनाची बैठक बोलवावी. या मागण्या मान्य न झाल्यास शिष्टमंडळ साखर आयुक्तांना भेटणार आहे. तसेच, या प्रश्नसाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी सोपान काळे, किसन पवार, राजू उगलमुगले, दीपक शिंदे, रवींद्र निळ, संजय उगले, कृष्णा काळे, महादेव बोडखे, प्रमोद गर्जे, वंचितचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, भगवान काळे, नितीन जाधव, मनिषा आंधळे, सुरेश खंडागळे, लक्ष्मण मोरे, सागर गरुड, चांदभाई शेख, लक्ष्मण माळी, सलीम शेख, महादेव वाकडे, हरिभाऊ काळे, संदीप साळवे, ब्रम्हनाथ डाके, दत्ता घरवाढवे आदींसह शेतकरी उपस्थित होते.