महाराष्ट्र
टेम्पो अंगावर घालून केले ठार;माझा मुलगा मला परत द्या' अशी विनंती करत होता जावई
By Admin
टेम्पो अंगावर घालून केले ठार;माझा मुलगा मला परत द्या' अशी विनंती करत होता जावई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
माझा मुलगा मला परत द्या, अशी विनंती करणाऱ्या जावयाला मारहाण करत सासरवाडीतील लोकांनी टेम्पो अंगावर घालून ठार केल्याची घटना कर्जत तालुक्यातील कौडाणे येथे घडली आहे.
गुरुवारी २६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला असून, या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कौडाणे गावात महादेव बाळासाहेब सुद्रिक यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी रवींद्र सदाशिव सुद्रिक, बाबासाहेब दत्तात्रय सुद्रीक, नरेंद्र सदाशिव सुद्रिक, विठ्ठल सदाशिव सुद्रीक, अमोल बाबासाहेब सुद्रिक, सदाशिव दत्तात्रय सुद्रिक सर्व राहणार मुळेवाडी, तालुका कर्जत हे निळ्या रंगाचा 407 टेम्पो घेऊन आले होते. दुपारी एकच्या सुमारास मयत दत्तात्रय जानू मुळे यांचा भाऊ सुनील मुळे यांना गावाच्या वेशीजवळ लोकांची गर्दी दिसली. जवळ जाऊन पाहिले असता त्यांचा भाऊ दत्तात्रय हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला.
त्यावेळी तेथे गावातील संजय पंढरीनाथ सुद्रीक यांनी सुनील मुळे यांना सांगितले की, टेम्पोत बसलेल्यांना ‘माझा मुलगा मला परत द्या, अशी विनंती दत्तात्रय करत होता. मात्र रविंद्र बाबासाहेब सुद्रिक, बाबासाहेब दत्तात्रय सुद्रीक, नरेंद्र सदाशिव सुद्रीक, विठ्ठल सदाशिव सुद्रीक, अमोल बाबासाहेब सुद्रीक, सदाशिव दत्तात्रय सुद्रीक या लोकांमधील दोघांनी मुळे यांना संगनमत करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना जमिनीवरही जोरात आपटले. तेवढ्यात कोणीतरी टेम्पो चालक विनोद प्रशांत गोल्हार यांना टेम्पोने ठोस मारण्याची चिथावणी दिली. या चिथवाणीमुळे चालकाने टेम्पो अंगावर घातला. यामुळे दत्तात्रय यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली व त्यात त्यांचा मृत्यू झाला.
मारहाण करत टेम्पो अंगावर घालून ठार मारल्याप्रकरणी सुनिल मुळे यांनी ७ आरोपींविरुद्ध कलम ३०२, ३२३, १०९ व ३४ या प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश गावित यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सतिश गावित हे करत आहेत.
Tags :
73053
10