महाराष्ट्र
जीवनाची कृतार्थता अनुभवण्यासाठी बसवेश्वरांच्या संदेशानुसार आचरण करा- मिलिंद चवंडके
By Admin
जीवनाची कृतार्थता अनुभवण्यासाठी बसवेश्वरांच्या संदेशानुसार आचरण करा- मिलिंद चवंडके
पाथर्डी- प्रतिनिधी
जीवनाची कृतार्थता अनुभवण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या संदेशानुसार आचरण करा,असे आवाहन बसवतत्व व लिंगायत साहित्याचे अभ्यासक,जेष्ठ पत्रकार मिलिंद चवंडके यांनी केले.पाथर्डी येथे जिरेसाळ गल्लीतील पिनाकेश्वर मंदिरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते.
मिलिंद चवंडके यांच्या अमृतवाणीतील प्रवचन श्रवण करतांना उपस्थित स्त्री-पुरूष श्रोतृवृंद मंत्रमुग्ध झाला होता.
महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले,स्वागत व प्रास्तविक करताना लिंगायत संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष संतोष जिरेसाळ म्हणाले,महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करतांना त्यांचे विचार समजून घेण्याकरिता प्रथमच प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.महादेव सोनवणे यांनी प्रवचनकर्ते मिलिंद चवंडके यांचा परिचय करून दिला.व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचे विभागमंत्री सुनिलराव खिस्ती व पत्रकार विजयकुमार शिवगजे उपस्थित होते.
प्रवचन करतांना पुढे मिलिंद चवंडके म्हणाले,महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करतांना बसवेश्वरांचे जीवनकार्य समजून घेण्याची उत्सुकता पाहून आनंद वाटला,अक्षयतृतीयेच्या सुमूर्तावर बसवेश्वरांनी ११०५ साली जन्म घेतला.कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी ही त्यांची जन्मभूमी.मामांचे गावी मंगळवेढा येथे ते २२ वर्षे राहिले. त्यांच्या अनेक सुधारणावादी सामाजिक विचारकार्याची सुरूवात मंगळवेढ्यात म्हणजेच महाराष्ट्रातच झाली,हा इतिहास लक्षात घेतल्यास महात्मा बसवेश्वर हे महाराष्ट्राचेच असे म्हटले पाहिजे.
बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण ही त्यांची कर्मभूमी महाराष्ट्राच्या सिमेवरच आहे. कर्नाटकवासियांना बसवेश्वर जितके समजले त्या तुलनेत महाराष्ट्रवासियांना ते समजले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कर्नाटक सरकारने २००५ साली महात्मा बसवेश्वरांच्या ११०५ या जन्मवर्षाला मान्यता दिली त्याचवर्षी केंद्र सरकारने बसवेश्वरांची प्रतिमा असलेले पाच रूपयांचे नाणे व पोष्टाचे तिकीट काढले. बेंगलोरच्या विधानसभेत बसवेश्वरांचा पूर्णाकृती पुतळा बसवला. मध्ययुगीन भारताच्या ऐतिहासिक,धार्मिक,साहित्यिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, सामाजिक व राजकिय क्षेत्रात बसवेश्वरांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळेपणाचा ठसा उमटविला.संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अभंग रचना केली. ज्ञानेश्वर माऊलींनी ओवी रचना केली तशी महात्मा बसवेश्वरांनी वचने लिहिली.त्यांनी लिहिलेली ६८ हजार वचने आजही उपलब्ध आहेत. ताम्रपटांवरील या वचनांचे चिंतन म्हणजे अमृतप्राशन योग.विचार आणि आचार यांचा अप्रतिम समन्वय वचनांमध्ये साधलेला दिसतो.मानवी जीवनाला अधिकारवाणीने मार्गदर्शन करण्याची परिपूर्ण क्षमता या वचन साहित्यात सामावलेली असल्याची अनुभूती मिळते.बसवेश्वरांचे वचन हे केवळ ओठांमधून आलेले विचार नसून अंतःकरणामधून आलेली आत्मिक शक्तीच आहे. गळ्यात नित्य धारण करावयाच्या इष्टलिंग स्वरूपातच शिवोपासना केली पाहिजे असे ते सांगत.श्रमाला त्यांनी प्रतिष्ठा देताना "श्रम हाच कैलास"असे म्हटले. माणुसकी केंद्रबिंदू ठेवून कष्टाला प्राधान्य देत दानधर्माला महत्व दिले.
बाराव्या शतकात बसवकल्याण येथे त्यांनी जगातील पहिली लोकसंसद स्थापिली.२७ वर्षे चाललेल्या या लोकसंसदेत ७०० पुरूष व ७० महिला होत्या.अल्लमप्रभूंना त्यांनी पहिल्या अध्यक्षपदाचा सन्मान दिला होता. आदर्श जीवन कसे जगावे याचे नियम बनवून ते आचरणात आणण्याचे कार्य या लोकसंसदेने केले.पंचसूतकांची,पुनर्जन्माची कल्पना अमान्य केली.मरणास "महानवमी" म्हटले.देहास देवालय समजून शंभू महादेव या एकाच ईश्वराची श्रध्देने पूजा करून आत्मकल्याण साधण्याचा कृतीशील संदेश बसवेश्वरांनी दिला.बागलकोट जिल्ह्यातील कुडलसंगम ही त्यांची ऐक्यभूमी.कृष्णा,मलप्रभा व घटप्रभा या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर ते लिंगैक्य झाले.आजही भाविक त्यांच्या पावन समाधीस्थानी नतमस्तक होत चैतन्याचा अनुभव घेतात.कर्म,दान,धर्म,दासोह (प्रसादभोजन) ही बसवेश्वरांनी सांगितलेली चतुसूत्री जीवनाच्या कृतार्थतेचे गूज सांगते.इष्टलिंग उपासनेचे समर्थक,आंतरजातीय विवाहाचे प्रणेते,भारतीय राजकारणातील पहिले पंतप्रधान,स्त्री स्वातंत्र्याचे पहिले वैश्विक दीक्षागुरू बसवेश्वर होत. बसवेश्वरांचा हा ९१७ वा जयंतीदिन आपण साजरा करतो आहोत,असे मिलिंद चवंडके यांनी सांगितले. बसवेश्वरांच्या जीवनकार्याचा आढावा श्रवण करतांना तल्लीन झालेल्या श्रोत्यांशी मिलिंद चवंडके यांनी साधलेला संवादही श्रोत्यांना अधिक भावला. लिंगायत समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत असलेल्या लिंगायत संघर्ष समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संतोष जिरेसाळ यांचा सर्व समाज बांधवांचे वतीने सत्कार करण्यात आला.या सोहळ्याची महाप्रसाद सेवा घेतलेल्या सुहास शेळगांवकर,कोरोनाकाळात विशेष सेवा केलेल्या नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्ता ढवळे,काळू दिनकर, लक्ष्मण दिनकर यांनाही सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचलन राजेंद्र उदारे यांनी केले तर सुहास शेळगांवकर यांनी आभार मानले.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी दयानंद जिरेसाळ,राजेंद्र उदारे संतोष बुरसे, शुभम जिरेसाळ,सचिन फुटाणे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
प्रवचन सोहळ्यास संजय पैठणकर, प्रभाकर इजारे, विट्ठलराव हंपे,अभिजित गुजर,संतोष मेघुंडे, सुखदेव मर्दाने,हाजी हुमायून आतार,बाळासाहेब जिरेसाळ,गजानन तारापुरे,शिवाजीराव सुपेकर,पद्माकर बगले,तुषार बुरसे,किशोर फुलशेटे, शुभम जिरेसाळ,विरभद्र जंगम,पुरूषोत्तम इजारे,गजानन सराईकर आदींसह लिंगायत समाजबांधव व भगिनी उपस्थित होत्या.
Tags :
404
10