कोमल वाकळे हिची नॅशनल गेम्स, वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
पाथर्डी- प्रतिनिधी
कोमल वाकळे हिची गुजरात येथे दिनांक २९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२२ रोजी होणाऱ्या ३६ व्या नॅशनल गेम्स मध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी ८७ किलो वजन गटात महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. भारताच्या प्रतिष्ठित असलेल्या या स्पर्धेत एकूण ३६ क्रीडा प्रकारात भारतातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे संघ सहभागी होणार आहे. सदर स्पर्धा सात वर्षांनी होत असून या आधीची स्पर्धा २०१५ मध्ये केरळ येथे झाली होती.
कोमल वाकळे हिने अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक मिळविले असून ती बाबूजी आव्हाड महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. मागील दीड वर्षापासून ती बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या वेटलिफ्टिंग सेंटरवर सराव करत आहे.
या यशाबद्दल पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष व पाथर्डी तालुका वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी तिचा सत्कार करून तिला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे व अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रा. विजय देशमुख हे उपस्थित होते. या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख व उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी अभिनंदन केले, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.