कौन बनेगा करोडपती'पायी नादात गमावले सव्वा लाख, भामट्यांनी घातला गंडा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कौन बनेगा करोडपती'च्या नावाखाली सर्जेपुरा भागातील तरुणाची एक लाख ३३ हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
अहमदनगर - 'कौन बनेगा करोडपती'च्या नावाखाली सर्जेपुरा भागातील तरुणाची एक लाख ३३ हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी येथील सायबर पोलिस ठाण्यात तीन मोबाईलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नारायण गजराज अरुणे (वय २९, रा. सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली.
फिर्यादी यांना एक दिवस एका मोबाईल नंबरवरून फोन आला, की 'कौन बनेगा करोडपती'मधून बोलत आहोत. तुमचा मोबाईल क्रमांक हा लकी विनर म्हणून निवडला आहे. त्यावरून तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी देण्यात येत आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरवरूनही असाच फोन आला. या दोन्ही मोबाईल क्रमांक धारक व्यक्तींनी फिर्यादीशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच २५ लाखांची लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी, इन्कम टॅक्सच्या नावाखाली सुरुवातीला काही पैसे त्यांच्या गुगल पे अकाऊंटवर पाठवण्यास सांगितले.
२५ लाख रुपये मिळणार या आशेवर फिर्यादी यांनी ता. २० ऑगस्ट २०२१ ते ता. १० मार्च २०२२ या कालावधीत एक लाख ३३ हजार २०० रुपये गुगल पे तसेच बँक खात्यावर पाठवले. त्यानंतर तीनही मोबाईल नंबर बंद झाले. अनेक वेळा संपर्क करूनही त्या मोबाईलधारकांशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यांना लॉटरीचे पैसेही मिळाले नाहीत. अरुणे यांनी ता. १ ऑगस्ट रोजी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.