महाराष्ट्र
लग्नाच्या रात्रीच नवरी दागिन्यांसह पसार! बेन्टेक्सचे दागिने असल्याने पचका!
By Admin
लग्नाच्या रात्रीच नवरी दागिन्यांसह पसार! बेन्टेक्सचे दागिने असल्याने पचका!
नगर तालुक्यातील वाळकी गावातील घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
लग्न म्हटलं की विश्वासाच्या नात्यातून दोन परिवार एकत्र येतात. अन् पती-पत्नीच्या संसाराची सुरुवात होऊन, दोघेही सुखी संसाराची स्वप्ने रंगवितात.
अशातच या नात्याचा विश्वासघात झाल्याची घटना घडली तर ती मात्र फारच असह्य होते. असाच एक प्रकार नगर तालुक्यातील वाळकी गावात घडला आहे. नवरीच्या बापाला सुमारे दीड लाख रुपये देऊन लग्न करून आणलेली नवी नवरी लग्नाच्या पहिल्या रात्रीच पळून गेली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळकी गावातील 2 उपवर मुलांचे लग्न जमविण्यासाठी त्यांनी औरंगाबाद येथील एका मध्यस्थास सांगितले होते. त्या मध्यस्थाने विदर्भ, मराठवाड्यातील 2 मुलींचे स्थळ आणले. दोन्ही मुली एकमेकींच्या नात्यातील असल्याची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. मुलांना मुली पसंत पडल्या आणि लग्नाची बोलणी होऊन लग्नही ठरले. या दोन्ही मुलींच्या वडिलांना मुलांच्या कुटुंबीयांनी प्रत्येकी दीड लाख, असे दोघींचे 3 लाख रुपये देण्याचे ठरले होते.
ठरल्याप्रमाणे चिखली गावाजवळील साकळाई देवीच्या मंदिरात सोमवारी (दि.18) दुपारी दीडच्या सुमारास दोन्ही विवाहसोहळे साध्या पद्धतीने पार पडले. दोन्ही मुलींचे मिळून 5 ते 6 नातेवाईक या लग्नाला उपस्थित होते. लग्न होताच दोन्ही मुलींचे 3 लाख रुपये घेऊन ते नातेवाईक निघून गेले. त्यानंतर नव्या नवरदेव-नवरीसह सर्वजण आनंदाने घरी परतले. मात्र, रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर त्यातील एका नवर्या मुलीने अंगावरील दागिन्यांसह पलायन केले. एखाद्या चित्रपटाच्या कथानकात घडणारा हा प्रकार घडला. मंगळवारी (दि.19) सकाळी नवरा मुलगा व त्याचे कुटुंबीय झोपेतून उठल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे नवरदेव व त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का बसला.
नागरिकांनी खबरदारी घ्यावी : सानप
लग्नात मुलीच्या कुटुंबीयांकडून हुंडा घेणे हा गुन्हा आहे. तसेच, मुलीच्या वडिलांना पैसे देऊन मुलीचे लग्न करून आणणे हाही गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा गोष्टी करू नयेत. तसेच, मुलामुलींचे लग्न अनोळखी व्यक्तीच्या मध्यस्थीने जुळवू नयेत. मुलींचे फसवे लग्न लावून देणार्या अनेक टोळ्या सध्या सक्रिय असल्याने सर्वांनी खबरदारी घेत आपली संभाव्य फसवणूक टाळावी, असे आवाहन नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे.
कुलूप लावल्याने दुसरी मुलगी राहिली
लग्न करून आणलेल्या दोन मुलींपैकी एक नवरी मुलगी रात्री पळून गेली. मात्र, दुसर्या कुटुंबाने खबरदारी घेत नवरी झोपलेल्या खोलीला बाहेरून कुलूप लावले होते. त्यामुळे ती नवरी घरातच राहिली. पळून गेलेल्या नवरीने मुलाकडील मंडळींनी लग्नात अंगावर घातलेले सर्व दागिने घेऊन पोबारा केला. मात्र, ते दागिने बेन्टेक्सचे असल्याने आणखी फार मोठे नुकसान झाले नाही. मात्र, त्यांनी दिलेले दीड लाखही गेले आणि मुलगीही पळाली, नशिबी मनस्ताप आला, अशी अवस्था या कुटुंबाची झाली आहे.
फसव्या लग्नांच्या घटना वाढू लागल्या
मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झाल्याने, लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे काही दलालांनी तर लग्नाळू नवर्या मुलाच्या कुटुंबियांकडून पैसे घेऊन मुलींचे लग्न लावून देण्याचे आणि नंतर नवरीला फरार करण्याचे उद्योगही सुरू केले आहेत. जिल्ह्यात विशेषतः श्रीगोंदा, नेवासे, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर या तालुक्यात यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांनी काही टोळ्यांना यापूर्वी अटकही केलेली आहे. नगर तालुक्यातही काही दिवसांपूर्वी रुईछत्तीशी गावातही अशीच घटना घडली होती.
Tags :
2547
10