कार नदीत बुडून दोघांना जलसमाधी;एक जण बेपत्ता
By Admin
कार नदीत बुडून दोघांना जलसमाधी;एक जण बेपत्ता
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
वळणाचा अंदाज न आल्याने पर्यटकांची कार कृष्णवंती नदीपात्रात बुडून औरंगाबादच्या दोघांना जलसमाधी मिळाली. त्यांच्या मदतीसाठी धावलेला तिसरा नाशिकचा पर्यटक नदीप्रवाहात बेपत्ता झाला आहे.
कारमधील एक पर्यटक सुदैवाने बचावला. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात वारंघुशी फाट्याजवळ शुक्रवारी (दि.१६) रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. बेपत्ता झालेल्यांचा शोध अजूनही सुरूच आहे.
अॅड. आशिष प्रभाकर पालोदकर (वय 34, रा. पालोद, ता. सिल्लोड), रमाकांत प्रभाकर देशमुख (वय 34, रा. ताडपिपंळगाव, ता. कन्नड) अशी मृत दोघांची नावे आहेत. बुडणार्यांना मदत करणारे नाशिकचे तुकाराम रामदास चांगटे हे मात्र बेपत्ता झाले आहेत. अॅड. अनंता रामराव मगर (रा. शिंगी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) हे सुदैवाने बचावले.
याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारदरा परिसरात निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी गुगल मॅपचा आधार घेत पर्यटक आले होते. यावेळी कार वारंघुशी फाट्याजवळ वळणाचा अंदाज न आल्याने कृष्णवंती नदी पात्रात बुडाली. कार पाण्यात बुडत असतानाच अनंता रामराव मगर हे कसेबसे कारच्या बाहेर पडल्याने ते बचावले. तर नाशिकचे तुकाराम रामदास चांगटे (वय 72) हे नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
यावेळी भंडारदरा धरण बघून नाशिकचे पर्यटक माघारी जाताना दुर्घटनास्थळी मदतीसाठी थांबले. घटनेची माहिती कळताच राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, हवालदार दिलीप डगळे, अशोक गाडे, अशोक काळे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर वारंघुशी, पेडशेत गावकर्यांच्या मदतीने जेसीबी, ट्रॅक्टरने नदीपात्रात बुडालेली कार ओढून बाहेर काढण्यात आली. राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह शनिवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
आधार कार्डावरून पटली ओळख
कारमधील मृत आशिष हे औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, काँग्रेस नेते प्रभाकर पालोदकर यांचे चिरंजीव होते. आशिष व रमाकांत हे दोघे जीवलग मित्र होते. मृत्यूच्या दाढेतून परत आलेले अनंता हे प्रचंड घाबरल्याने त्यांना मृतांची नावेही सांगता येत नव्हती. पोलिसांना मृतांच्या पँटच्या खिशातील आधार कार्डवरुन दोघांची ओळख पटविण्यात यश आले.
अकोल्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यावरून पाणी वेगाने वाहत आहे. अरूंद रस्ते, छोटे पूल असल्याने डोंगर दर्यांमधून येणार्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे, धाडसाने कार पाण्यात घालण्याचा प्रयत्न तसेच स्टंटबाजी करू नये, धोकादायक ठिकाणी जावू नये. सेल्फीच्या नादात दरी, पाणी, भिंती, ओढे, झाडांजवळ धाडसी प्रयोग करु नये. प्रतिबंधित ठिकाणी जावू नये. काही आक्षेपार्ह किंवा संशयित वाटले, तर तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी केले आहे.