राजकीय घडामोडीना वेग,भाजप- राष्ट्रवादीत खरी लढत 'या' तालुक्यात पक्षाकडून उमेदवारी चाचपणी
By Admin
राजकीय घडामोडीना वेग,भाजप- राष्ट्रवादीत खरी लढत 'या' तालुक्यात पक्षाकडून उमेदवारी चाचपणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जामखेड नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे गटात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना आदींसह वंचित, मनसे आदी पक्षांच्या राजकीय नेत्यांनी आता कंबर कसली असून, मोर्चेबांधणी व बैठकांचे सत्र सुरू केले आहे.
त्यातूनच इच्छुकांची चाचपणी केली जात आहे.
नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दि. 18 ऑगस्टला होत आहे. शहरात पूर्वी 21 प्रभागांमधून 21 सदस्य निवडून गेले होते. पालिकेत अनुक्रमे राष्ट्रवादी, भाजप पुन्हा राष्ट्रवादी अशी सत्तेची समीकरणे होती. मागील पाच वर्षांत जामखेड नगरपालिकेचा कारभार प्रीती राळेभात, अर्चना सोमनाथ राळेभात, निखिल घायतडक या चेहऱ्यांभोवती फिरत होता.त्यावेळी राष्ट्रवादीचे 10, शिवसेना 4, भाजप 3 मनसे 1 अपक्ष 3 असे संख्याबळ होते. सन 2022च्या निवडणुकीसाठी 12 प्रभागांतून 24 सदस्य निवडून द्यायचे असून, त्यामध्ये 11 महिलांना संधी मिळणार आहे.
नगराध्यक्षपदाची निवड हे निवडून आलेल्या सदस्य संख्येतून होणार की जनतेमधून याकडेही सर्वच लक्ष लागल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण होणार आहे. राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी बैठका घेऊन इच्छुकांची चाचपणी करीत आहेत. जामखेड नगरपालिकेच्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. पवार, भाजपचे प्रा. शिंदे आदींची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. प्रभागरचनेत बदल करण्यात आल्याने अनेक इच्छुकांना विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेना भाजप युतीत, तर राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीत लढले होते, परंतु या निवडणुकीसाठी कोणासोबत गटबंधन होते की स्वतंत्र लढणार अद्यापही गुलदस्त्यात असल्यामुळे इच्छुक उमेदवार संभ्रमात सापडला आहे.
आ. पवार यांचे राजकीय कसब पणाला
सन 2014 च्या निवडणूक वेळी राज्यात युतीचे सरकार व तालुक्यात भाजपचा आमदार हे मंत्री असतानाही तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 10 जागा लागल्या होत्या. आमदार रोहित पवार यांना राष्ट्रवादीचे वर्चस्वा टिकवण्यासाठी उमेदवारी देताना महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व कॉंग्रेसच्या जागा सोडुन विचार करावा लागणार आहे. यामुळे निवडणुकीत आ.पवार यांचे राजकिय कसब पणाला लागणार आहे.
आ. शिंदेंना चाणाक्षपणा दाखवावा लागणार
सन 2014 च्या निवडणुकीत अनेक ठिकाणी उमेदवारी देताना झालेल्या “चुकांचा’ मोठा फटका भाजपला अर्थातच तत्कालीन मंत्री राम शिंदे यांना बसला होता. त्यावेळी अमित चिंतामणी, अर्चना राळेभात, वैशाली झेंडे हे तीनच नगरसेवक भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. आता यावेळी आ. शिंदे यांना उमेदवार निवडीत राजकीय चाणाक्षपणा दाखवला तर येणारी नगरपालिक निवडणूक चुरशीची होईल.

