महाराष्ट्र
93284
10
शिक्षण संस्था व शिक्षणाधिकाऱ्यांनी सेवाजेष्ठतेबाबत राजपत्रानुसार कार्यवाही करावी-
By Admin
शिक्षण संस्था व शिक्षणाधिकाऱ्यांनी सेवाजेष्ठतेबाबत राजपत्रानुसार कार्यवाही करावी- अध्यक्ष दिलीप आवारे
सेवाज्येष्ठतेबाबतचे राजपत्र स्वयंस्पष्ट आणि कायदेशीरच
पाथर्डी प्रतिनिधी:
माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत दि.२४ मार्च २०२३ रोजी राजपत्र(अधिसूचना)जारी करण्यात आले.राजपत्रात डी.एड.शिक्षक,हिंदी शिक्षक सनद प्राप्त शिक्षक, कला - क्रीडा शिक्षक यांच्या बाबतीत अनुसूची फ, प्रवर्ग क मधील समावेशाबाबत स्पष्टता आणण्यात आलेली आहे.
डी.एड.(दोन वर्षांचा जुना पाठ्यक्रम)अशी अर्हताधारक शिक्षक सेवेत आल्यानंतर ज्या तारखेला पदवी (बी.ए/बी.कॉम./बी.एस्सी.)प्राप्त करील,त्या तारखेपासून प्रवर्ग क मध्ये समाविष्ट होईल,ही बाब या राजपत्रातून स्पष्ट झाली आहे.
अनुसूची फ मधील टीप ०१ ही अप्रशिक्षित शिक्षकांच्या प्रयोजनार्थ दिलेली आहे.राजपत्रात टीप १(अ)(ब)(क)(ड)अशा उपटीपा दिलेल्या आहेत.या उपटीपा व्यवस्थित अभ्यासल्या तर त्या अप्रशिक्षित शिक्षकांसाठी आहेत,हे स्पष्ट होते.
डी.एड.(दोन वर्षांचा जुना पाठ्यक्रम) अशी अर्हता असणारा शिक्षक हा प्रशिक्षित असून ज्येष्ठतेच्या प्रयोजनार्थ त्याला ग्राह्य धरण्यात यावे,असे अनुसूची फ मधील टीप ०२ मध्ये स्पष्ट नमूद केले आहे.साहजिकच राजपत्रातील उपटीपा या डी.एड.(दोन वर्षांचा जुना पाठ्यक्रम) या प्रशिक्षित शिक्षकाला लागू पडत नसून त्या केवळ अप्रशिक्षित शिक्षकांसाठी लागू पडतात,हे स्पष्ट आहे.
प्रवर्ग क मध्ये शैक्षणिक पदवीसह डीप.टी.(दोन वर्षांचा जुना पाठ्यक्रम)अशी अर्हता असणारा शिक्षक सन १९८१ पासूनच आहे.डीप.टी.चेच नाव पुढे डी.एड.झाले,असे शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहिती अधिकारातून आणि एससीईआरटी(SCERT) ने दिलेल्या पत्रातून स्पष्ट झाले आहे.त्यामुळे राजपत्रात प्रवर्ग क मध्ये जास्तीची अशी भर काहीच पडलेली नाही ; तर केवळ स्पष्टता आणली गेली आहे.
राजपत्र स्वयंस्पष्ट आहे,अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहिती अधिकारातून मिळाली आहे.राजपत्र हरकती/आक्षेपांसाठी प्रसिद्ध करणे,वैधानिक प्रधिकाराखाली विधानमंडळात मांडणे आदी प्रक्रियेतून राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने जारी करण्यात आले आहे.ते पूर्णपणे कायदेशीर आहे.
महाराष्ट्रातील शिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक यांनी ज्येष्ठतेबाबत राजपत्रानुसार कार्यवाही करावी.न्याय्य भूमिका घ्यावी,असे आवाहन पदवीधर डी एड शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री.दिलीप आवारे,सचिव श्री महादेव माने यांनी केले आहे.
Tags :

