महाराष्ट्र
14819
10
मढी येथील यात्रेत पंजाबी गाढवांना लाखो रुपयांची किंमत मिळाली.
By Admin
मढी येथील यात्रेत पंजाबी गाढवांना लाखो रुपयांची किंमत मिळाली.
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मढी येथे कानिफनाथ यात्रेला सुरुवात झाली असून 'कानिफनाथकी जय', अशा घोषणा देत आज राज्यासह परराज्यातून आलेल्या लाखो भाविकांनी कानिफनाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी गाढवांच्या बाजारात पहिल्यांदाच दाखल झालेल्या पंजाबी गाढवांना लाखो रुपयांची किंमत मिळाली.
होळी, रंगपंचमी व फुलोरबाग अशा तीन टप्य्यांत मढी यात्रा भरत असली, तरीही रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतल्याने मढी यात्रेचा हा मुख्य दिवस मानला जातो. यात्रा उत्सवानिमित्त आज सकाळपासूनच मढीकडे जाणारे सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. देवस्थान समितीने दर्शनासाठी एकेरीबारी केल्याने मुख्य मंदिरात भाविकांची गैरसोय झाली नाही. ठिकठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेनिमित्त मुख्य गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता.
यात्रेला आलेले भक्त नाथांचा प्रसाद म्हणून रेवड्या नाथांच्या समाधीला वाहून घरी घेऊन जात असल्याने रेवड्यांच्या बाजारात मोठी उलाढाल झाली. मढी येथील प्रसिद्ध गाढवांच्या बाजारात काठेवाडी आणि गुजराती गाढवांना मोठी मागणी असते. आज प्रथमच या बाजारात पंजाबी गाढवं दाखल झाल्यामुळे त्यांच्या मागणीत वाढ झाली. एका पंजाबी गाढवाला 1 लाख रुपये भाव मिळाला, तर 3 पंजाबी गाढवं पावणेतीन लाख रुपयांना विकली गेली. काठेवाडी आणि गावरान गाढवांनासुद्धा चांगली मागणी होती.
जिह्यातील सर्वच आगारातून मढी यात्रेला जाण्यासाठी एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. मढी ते निवडुंगे आणि तिसगाव येथे वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले. वाहतुकीचा गैरफायदा घेऊन खिसेकापूंनी अनेकांचे मोबाईल, महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरले. भाविकांचे स्वागत देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, सचिन गवारे, भाऊसाहेब मरकड, शिवजीत डोके, रवींद्र आरोळे आदींनी केले.
Tags :
14819
10





