महाराष्ट्र
आमदार निलेश लंकेंची मध्यस्थी; शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने उपोषण मागे
By Admin
आमदार निलेश लंकेंची मध्यस्थी; शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने उपोषण मागे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज येथील शेतकर्यांच्या उजनी प्रकल्पामध्ये संपादित झालेल्या वडिलोपार्जित जमिनीत झालेले अतिक्रमण काढून मूळ प्रकल्पग्रस्तांना गाळपेरीची परवानगी देण्यात यावी, यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर अजनूज येथील शेतकर्यांनी केलेल्या उपोषणास राष्ट्रवादीचे पारनेर येथील आ.नीलेश लंके यांनी भेट देऊन यशस्वी मध्यस्थी केली.
उजनी प्रकल्पाच्या अधिकार्यांनी एका महिन्यात मोजणीचे पैसे भरून झालेले अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिल्याने शेतकर्यांनी केलेले उपोषण मागे घेण्यात आले.
तालुक्यातील अजनूज येथील उपोषणकर्ते शेतकरी यांनी यापूर्वी दिलेल्या अर्जानुसार उजनी प्रकल्पामध्ये संपादित झालेली वडिलोपार्जित जमिन जुने गट नं.-883, 880,886, 902,872,893,894,12,871 व नवीन गट नं. 454 / 2, 452/2, 457/2, 472/2, 444/2, 460/2, 461, 443 / 2 यामध्ये उजनी जलाशयाचे पाणी कधीही नसते अशा जमिनीमध्ये उजनी जलाशयाचे पाणी येत नसल्याने या जमिनीमध्ये काही जणांनी कायदेशीर हितसंबंध नसताना बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले आहे.
त्रयस्थ शेतकरी पिके घेत असून याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे प्रकल्पग्रस्ताच्या हक्कास बाधा येत असल्याच्या कारणातून येथील शेतकर्यांनी शासनाने संपादन केलेल्या जमिनीवरील बेकायदेशीररित्या केलेले त्रयस्थ शेतकर्यांचे अतिक्रमण हटविण्याबाबत भीमानगर (उजनी) येथे दि.6 डिसेंबर रोजी उपोषण केले होते.
शासन निर्णयाप्रमाणे मूळ प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या उजनी प्रकल्पात संपादित झालेल्या जमिनी (गाळपेर) करार पद्धतीने वहिती करण्यास अग्रक्रम प्रकल्पग्रस्त व्यक्तीस मिळावेत. जलसंपदा विभाग तसेच महसूल विभाग व भूमी अभिलेख विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे दि. 13 डिसेंबर 2022 रोजी पाहणी करुन अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र भूमी अभिलेख विभागाची फी न भरल्यामुळे मोजणी होऊ शकली नसल्याने संबंधित गटाची जोपर्यंत मोजणी करुन अतिक्रमण हटवित नाहीत, तोपर्यंत मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्तीची उजनी संपादित जमिन ही स्वतः वहिवाटीत असल्यास तर त्या जमिनीशी (गाळपेर) कुठलाही संबंध नसलेल्या त्रयस्थ व्यक्तीच्या खोट्या अर्जावरून मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्तीस अतिक्रमीत समजू नये, या मागणीसाठी केलेले उपोषण पारनेरचे आमदार लंके यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. यावेळी बाबासाहेब भोस, राजेंद्र म्हस्के, तहसीलदार मिलिंद कुलथे, उजनी प्रकल्प अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख संदीप गोसावी यांच्यासह उपोषणकर्ते अनिल पांडुरंग क्षिरसागर, शिवाजी माणिकराव क्षिरसागर, गोरख चंद्रकात क्षिरसागर, जालिंदर नामदेव गिरमकर आणि मुळ प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
Tags :
76012
10