महाराष्ट्र
20561
10
शेवगाव-पाथर्डीवर सरकारने अन्याय केला; सरकारला घरचा आहेर !
By Admin
शेवगाव-पाथर्डीवर सरकारने अन्याय केला; सरकारला घरचा आहेर !
22 नोव्हेंबरपासून पाथर्डी येथे आमरण उपोषण करणार
पाथर्डी- प्रतिनिधी
यंदा राज्यात सरासरी साडेतेरा टक्के पाऊस कमी झालेला आहे. यात राज्यातील अनेक तालुक्यांतील शेतीला मोठी झळ पोहाेचली असून, खरिपाबरोबर आता रब्बी हंगाम वाया जात असल्याची परस्थिती आहे.
अशात राज्य सरकारने राज्यातील केवळ 40 तालुक्यांना दुष्काळी घोषित करत त्यांना केंद्र-राज्य शासनाच्या दुष्काळी परस्थितीत लागू होणाऱ्या सवलती दिल्या जाणार असल्याचे घोषित केले आहे. मात्र, राज्य सरकारच्या या घोषणेनंतर राज्यातील अनेक तालुक्यांतील शेतकरी वर्गात तीव्र नाराजी असून, शासनाला निवेदने देऊन प्रत्यक्ष परस्थितीची माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
नगर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झालेला असल्याची वस्तुस्थिती आहे. विशेष करून दक्षिण नगर जिल्ह्यातील सातही तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. नगर, पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी (Pathardi), श्रीगोंदा, शेवगाव तालुक्यातील खरीप हातातून गेला आहे. या भागाला पाणी आता पुणे जिल्ह्यातून अपेक्षित आहे. मात्र, त्यातही दरवर्षी संघर्ष करावा लागतो. अशात रब्बीच्या पेरण्या 10-12 टक्याच्या वर झालेल्या नाहीत. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे.
अशात आता केवळ विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी आणि नेत्यांबरोबरच सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदने देत जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळी यादीत नसल्याबद्दल अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि पथर्डीचे माजी पंचायत समिती अध्यक्ष गोकुळ दौंड यांनी पाथर्डी तहसीलदार यांना निवेदन देत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांना दुष्काळी तालुके घोषित करण्याची मागणी केली आहे.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजप आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) आहेत. मात्र, सत्तेत असताना पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देताना सरकार मतदारसंघावर अन्याय करत असल्याचा आरोपही केला आहे. याबाबत भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असलेले गोकुळ दौंड यांनी दिलेल्या निवेदनात पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील आम्ही सर्व शेतकरी सध्याची परिस्थिती पाहता पर्जन्यमान कमी प्रमाणात झाल्याने पिके वाया गेलेली आहेत, असे म्हणत सर्व शेतकरी चिंतेत असल्याचे सांगितले आहे.
दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दोन्ही हंगामातील पिके वाया गेलेली आहेत. तसेच शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी चारा उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेतकरी पशुधन कसे जगेल याची चिंता आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यामध्ये शासनाकडून जनावरांसाठी छावण्या व चारा डेपो सुरू करण्यात याव्यात. तसेच प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसल्याने पाणी टँकर सुरू करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेतून विविध प्रकारचे कामे सुरू करून शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.
राज्य सरकारने पाथर्डी शेवगाव तालुक्यावर अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तरी याबाबत शासनाने दखल घेऊन पाथर्डी व शेवगाव तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा, अशी मागणी गोकुळ दौंड यांनी केली आहे. तसेच शासनाने याची दखल घेऊन पाथर्डी शेवगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा आम्ही सर्व दोन्ही तालुक्यांतील शेतकरी 22 नोव्हेंबरपासून पाथर्डी येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Tags :
20561
10





