SSC Exam : दहावीचा पेपर सुरु असताना केंद्रावर जमावाची दगडफेक; भरारी पथकातील अधिकारी जखमी, अभियंता गंभीर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानुर येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयातील (jay bhavani madhyamik vidayala (takli manur) दहावीच्या परीक्षा केंद्रावर (SSC Exam) परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्या-काठ्या घेवून भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली.
संबंधित दंगेखाेरांचा परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न हाेता अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
आज (बुधवार) दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. टाकळीमानुर येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयात दहावीचा भूमिती विषयाचा २१७ विद्यार्थी पेपर देत हाेते. त्यावेळी परीक्षार्थींना कॉपी पुरवणाऱ्या जमावाने परीक्षा केंद्रात बळजबरी प्रवेश करत भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावून परीक्षार्थींना कॉपी करण्यास मुभा देण्याची मागणी केली. यावर भरारी पथक प्रमुख गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांनी कॉपी पुरवणाऱ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर जाण्यास सांगितले.
या गोष्टीचा जमावास राग आला. त्यांनी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर लाठ्या-काठ्या, दगड, गोटे यांच्या सहाय्याने हल्ला केला. यावेळी झालेल्या दगड फेकीत भरारी पथकातील पंचायत समितीचे अभियंता रामेश्वर शिवणकर हे गंभीर जखमी झाले अशी माहिती गट विकास अधिकारी जगदीश पालवे यांनी दिली. दरम्यान या घटनेची पाथर्डी पोलिस ठाण्यात अद्याप कोणती नाेंद झालेली नाही.