महाराष्ट्र
15322
10
नुकसानभरपाईसाठी हवेत 34 कोटी रूपये, 34 हजार 458 शेतकरी
By Admin
नुकसानभरपाईसाठी हवेत 34 कोटी रूपये, 34 हजार 458 शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात 7 ते 16 एप्रिल या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने 19 हजार 856 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. या नुकसानीचा आर्थिक फटका 34 हजार 458 शेतकऱयांना बसला.
बाधित शेतकऱयांना नुकसानभरपाई अदा करण्यासाठी 34 कोटी 50 लाख 11 हजार 200 रुपये अनुदानाची आवश्यकता आहे.
7 ते 16 एप्रिल या कालावधीत वादळी वारा, गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या अवकाळीचा फटका श्रीरामपूर तालुका वगळता उर्वरित 13 तालुक्यांतील 227 गावांना बसला आहे. या गावांतील 19 हजार 856 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 308 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचा समावेश आहे. नेवासा तालुक्यात सर्वाधिक 6 हजार 795 हेक्टर नुकसान झाले आहे. यामध्ये 372 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचा समावेश आहे. या तालुक्यातील शेतकऱयांना नुकसानभरपाईसाठी 11 कोटी 75 लाख 64 हजार रुपयांचा निधी शेवगाव तालुक्यातही 4 हजार 844 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
7 ते 16 एप्रिल या दहा दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने कांदा, मका व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना नुकसानभरपाई दिली जात आहे. शासनाने नुकसानभरपाईसाठी 27 मार्च 2023 रोजी नवीन दर जाहीर केले. त्यानुसार जिरायती पिकांसाठी 8 हजार 500 रुपये, बागायती पिकांसाठी 17 हजार, तर फळबागांसाठी 22 हजार 500 रुपये हेक्टरी अनुदान दोन हेक्टरपर्यंत मिळणार आहे.
एकूण बाधित क्षेत्र (हेक्टर)
नगर 1443, पारनेर 3194, पाथर्डी 5.30, कर्जत 107.60, जामखेड 16.29, श्रीगोंदा 704, राहुरी 481, नेवासा 6795, शेवगाव 4844, संगमनेर 1190, अकोले 652, कोपरगाव 167, राहाता 255.
दुसऱया दिवशीही पावसाने झोडपले
सोनई - अवकाळी पावसाने आज दुसऱया दिवशीही शनिवारी मुसळधार पावसाने सोनईला झोडपले. सोनईसह परिसराला सकाळी 11 ते 3 या वेळेत तीनवेळा वादळी वाऱयासह झालेल्या जोरदार पावसाने ओढे, नाले, वाहू लागले. शेतपिकाचे प्रचंड नुकसान झाले. श्रीगोंदा तालुक्यातील काही गावांत जोरदार पावसाने हजेरी लावल़ी यात पारगाव, घारगाव, घोटवी, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, पारगाव फाटा, श्रीगोंदा शहर, येळपणे यांसह काही भागात आलेल्या दुपारी बारा वाजल्यापासून आलेल्या पावसाने आणि गारपीट यामुळे उभ्या पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे.
बाभळीचे झाड घरावर पडून तरुणाचा मृत्यू
कोपरगाव तालुक्यातील रवंदे शिवारातील सहाचारी येथे वादळी वाऱयासह पावसामुळे घरावर बाभळीचे मोठे झाड पडून घरात बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दत्तात्रय संजय मोरे (वय 29) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, चासनळी आदिवासी परिसरातील श्रीमती सीताबाई माळी, ताराबाई माळी, संतोष पवार, विलास सूर्यवंशी यांच्या घरांचे नुकसान झाले.
नगर जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता
हिंदुस्थानच्या हवामान खात्याने नगर जिल्ह्यात 29 एप्रिल ते 2 मे या कालावधीमध्ये विजांच्या कडकडाटांसह गारपीट व मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केल़े.
Tags :
15322
10





