महाराष्ट्र
21354
10
सरकारच्या विरोधात सुरू केलं बेमुदत उपोषण;पाथर्डी
By Admin
सरकारच्या विरोधात सुरू केलं बेमुदत उपोषण;पाथर्डी-शेवगाव तालुके दुष्काळी जाहीर करावेत, या मागणीसाठी बेमुदत उपोषण
भाजप पदाधिकाऱ्यांचा पक्षाला घरचा आहेर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे राज्यातील जवळपास 40 तालुके राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले. राज्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा जवळपास साडे तेरा टक्के पाऊस कमी झालेला आहे.अशा परस्थितीत राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठ्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अत्यल्प पर्जन्यमानामुळे भयान परिस्थिती निर्माण झाली आहे.पण असे असतानाही जिल्ह्यातील एकाही तालुक्याला दुष्काळी तालुका घोषित करण्यात आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर पाथर्डी-शेवगाव तालुके दुष्काळी जाहीर करावेत, या मागणीसाठी भाजपचे ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनीच बेमुदत उपोषणाचा हत्यार सरकारच्या विरोधात उपसले आहे.जिल्ह्यात ज्या मंडळात पाऊस कमी झाला आहे, त्या अनुषंगाने महसूल प्रशासनाने 14 तालुक्यातील 96 महसुली मंडळे दुष्काळ सदृश घोषित केले आहेत. यातही जिरायती तालुका म्हणून ओळख असलेला पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील कोरडगाव मंडळातील 25 ते 30 गावांचा यातही समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार बद्दल चीड निर्माण झालेली आहे.पाथर्डी-शेवगाव मतदार संघात सर्वच गावे यंदा दुष्काळी छायेत आहेत. मात्र, सरकारने या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश केलेला नाही. कमी पावसावर येणारे कापूस पीक सुद्धा अत्यल्प पर्जन्यमानामुळे हातून गेले आहे.या अनुषंगाने वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिल्यानंतरही ही गावे दुष्काळ सदृश्य म्हणूनही नोंद झालेले नाहीत. मात्र, आता संपूर्ण पाथर्डी आणि शेवगाव हे दोन्ही तालुके पूर्णपणे दुष्काळी जाहीर करावेत, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.या बाबत गोकुळ दौंड यांनी सांगितले की, "पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील पर्जन्यमान कमी प्रमाणात झाल्याने पिके वाया गेलेली आहे. सर्व शेतकरी चिंतेत आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दोन्ही हंगामातील पिके वाया गेलेली आहे. तसेच शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकरी पशुधन कसे जगेल याची चिंतेत आहे.या परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यामध्ये शासनाकडून जनावरांसाठी छावण्या व चारा डेपो सुरु करण्यात यावी, तसेच प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसल्याने पाणी टँकर सुरु करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेतून विविध प्रकारचे कामे सुरु करुन शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, महाराष्ट्र शासनाने पाथर्डी - शेवगाव तालुक्यावर शासनाने अन्याय केला आहे. तरी याबाबत शासनाने दखल घेवून पाथर्डी व शेवगाव तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, शेवगाव पाथर्डी मतदारसंघातही भाजपचे लोकप्रतिनिधी आहे. असे असतानाही प्रशासनाने पाथर्डी-शेवगाव मतदारसंघावर अन्याय केलेला आहे. याला स्थानिक लोकप्रतिनिधीही कारणीभूत असल्याचा आरोप गोकुळ दौंड यांनी करत एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला घरचा आहेर दिला आहे. जोपर्यंत पाथर्डी-शेवगाव मतदार संघ पूर्णपणे दुष्काळी घोषित केला जात नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे इशारा दौंड यांनी दिला आहे.
Tags :
21354
10





