पाथर्डी- बालविवाह प्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मुलीचा बालविवाह केल्याच्या आरोपावरून पाथर्डी पोलिसांनी मुलीचा पती, सासरा, सासू, मुलीचे वडील यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात प्रथमच बालविवाहाच्या आरोपावरून लग्न लावणारे पुरोहित, मंडप, सजावटकार तसेच विवाहास उपस्थित असणाऱ्या २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील मर्जी संघटना व नगरमधील चाईडलाईन संघटना यांनी या विवाहाची माहिती पोलिस व पाथर्डीतील शिरसाटवाडीच्या सरपंचांना दिली होती. यासंदर्भात शिरसाटवाडीच्या ग्रामसेविका अर्चना विठ्ठल सानप यांनी पाथर्डी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा बालविवाह बुधवारी (२५ ऑगस्ट) शिरसाटवाडी गावातील भैरवनाथ मंदिरासमोर झाला. त्यानंतर आज, शुक्रवारी मुलीच्या वयाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीचे वय १४ वर्ष २ महिने ७ दिवसांचे आहे. तर मुलगा २१ वर्षांचा आहे. मुलाचे वडील शहादेव मच्छिंद्र शिरसाट, मुलगा सागर शिरसाट, मुलाची आई यांच्यासह मुलीचे वडिल तसेच लग्न लावणारे पुरोहित, लग्नासाठी मंडप टाकणारे व मोटार सजावट करणारे आणि शिरसाटवाडी व रांजणी या दोन्ही गावातील २० ते २५ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह प्रकरणात पोलिसांकडे फिर्याद कोणी द्यायची, याबद्दल या प्रकरणात गोंधळाची परिस्थिती होती. परंतु राज्य सरकारच्या सन २०१३ च्या अधिसूचनेप्रमाणे गावातील प्रशासनाने नेमून दिलेल्या ग्रामसेवक हे ग्रामपंचायत स्तरावर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत. याचे मार्गदर्शन चाईल्ड लाईन संघटनेने केल्यानंतर ग्रामसेविका सानप यांनी फिर्याद दिली.