बॕकेवर भरदिवसा धाडसी दरोडा, पोलिस आले आणि...
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर तालुक्यातील शेंडी येथील एका बँकेत आज, बुधवारी सकाळी नियमित कामकाज सुरू होते. अचानक बँकेमध्ये तीन हत्यारबंद दरोडेखोर घुसल्याने एकच खळबळ उडाली. या दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. ग्रामस्थांनी दरोडेखोरांना आमच्या हवाली करा, अशी मागणी केली. मात्र, जेव्हा हे पोलिसांचे मॉकड्रिल असल्याचे समोर आले, तेव्हा सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथे मॉकड्रिल केल्यानंतर आज, बुधवारी पोलिसांनी शेंडी येथे मॉकड्रिल केले. येथील बँकेमध्ये आज सकाळी दरोडेखोर घुसले. त्यावेळी बँकेशेजारील दुकानदाराने तातडीने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केला, आणि सगळ्यांना सतर्क केले. दहा मिनिटांत गावात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आणि त्यांनी बँकेला घेराव घातला. पोलिसांनी दरोडेखोरांना वारंवार आवाहन केले, तेव्हा दरोडेखोरांनी शरणागती पत्करली. या प्रकारामुळे शेंडी गावात काही काळ तणावाच वातावरण निर्माण झालें होते. मात्र संपूर्ण प्रसंगानंतर जेव्हा हे पोलिसांचे मॉकड्रील असल्याचा खुलासा झाला तेव्हा ग्रामस्थ अवाक झाले.
दरम्यान, ग्रामीण भागात वस्त्यांवर चोर्या, दरोड्याचे प्रकार झाल्यावर आधुनिक तंत्रज्ञानातून सुरक्षा यंत्रणा कशी सक्रिय करायची यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखली असे मॉकड्रिल विविध गावात आयोजित करण्यात येत आहे. शेंडी येथे झालेल्या या मॉकड्रिलबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी अनिल कटके, दत्तात्रय गोर्डे यांनी माहिती दिली. यासाठी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, पोलिस निरीक्षक अनिल कटके, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे तसेच सर्व कर्मचार्यांनी विशेष प्रयत्न केले.