पाथर्डी- राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने मार्गी लावा. ऋषिकेश ढाकणे यांची केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांना मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी: संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करीत उर्वरित काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. याबाबतचे गडकरी यांना लेखी देण्यात आले.
अहमदनगर ते पाथर्डी ते नांदेड पर्यंत जाणाऱ्या कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्गच्या नुतनीकरणाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्रालयामार्फत ठेकेदार नेमून गेल्या ५ वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेले आहे. पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ च्या नुतनीकरणासाठी सुरवातीला १३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गाच्या नुतनीकरणाचे कामकाज सुरु झाले व त्यासाठी अहमदनगर ते पाथर्डी ते पाडळसिंगी पर्यंतचे रस्ते व त्यावरील पूल एकदाच उखडून टाकण्यात आले. तसेच रस्त्याच्या कडेला असलेले जुने हिरवेगार ५ हजार वृक्ष तोडण्यात आले. मात्र ठेकेदाराच्या व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांच्या आळशी व निष्काळजी धोरणामुळे हे कामकाज गेल्या पाच वर्षापासून बंद पडलेले आहे. महामार्गाचे नुतनीकरण रखडल्याने याठिकाणी आज अखेर शेकडो अपघात झाले असून पोलिस दप्तरी असलेल्या अपघातांच्या आकडेवारी नुसार गेल्या पाच वर्षात जवळपास ३५० प्रवासी अपघातात ठार झाले असून शेकडो प्रवाश्यांना अपघातात अपंगत्व आले आहे. तरी या रस्त्याचे नुतनीकरणाचे ५ वर्षापासून रखडलेले काम पूर्ण व्हावी, अशी मागणी केली आहे.