कोरोना सेंटरचे उद्घाटन करतानाही मोदीवर टिका करतात. आ.मोनिका राजळे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : ‘कोरोना संकट जरी असले तरी प्रत्येक जण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र गेल्या एक दिड महिन्यापासून दिसत आहे. व्यासपीठ कुठे असावे, कुठे काय बोलावे, याचे तारतम्य आपल्या तालुक्यात राहिले नाही. कोरोना सेंटरचे उद्घाटन असले तरी भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे ,आमदार मोनिका राजळे यांच्यावर टीका कशी करता येईल, हे धोरण असून दुसरा कोणताच मुद्दा त्यांच्याकडे नाही,’ अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांवर केली.
तालुक्यातील चिंचपुर इजदे येथील विविध विकास कामाचे उदघाटन प्रसंगी राजळे बोलत होत्या. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, तालुका अध्यक्ष माणिकराव खेडकर, अर्जुनराव शिरसाट, सोमनाथ खेडकर, सरपंच पुष्पा मिसाळ, उपसरपंच वंदना नागरगोजे, विष्णुपंत अकोलकर, सुभाष केकान, धनंजय बडे, अशोक चोरमले, प्रतीक खेडकर, महेश अंगारखे, त्रिंबक खेडकर, भगवान दहिफळे, विनायक खेडकर, श्रीकांत खेडकर आदी उपस्थित होते. राजळे पुढे म्हणाल्या, ‘भाजप सरकारच्या मागील पाच वर्षाच्या काळात मतदार संघात विकासाची कामे झाली आहेत. त्यामुळे विकासाच्या बाबत मुद्दा घेऊन टीका करण्याची संधी विरोधकांना नाही. महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या काळात अनेक विकास कामांचा निधी मिळाला नाही. मात्र सत्तेतील लोक प्रतिनिधींनाच निधी दिला जाते आहे. विरोधातील लोक प्रतिनिधींना मिळणार निधी वळवला जात आहे.’