उधारीचे घेतलेले पैसे परत केले नाही,म्हणून मारहाणीत तरुणाचा खून
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 15 मे 2021 , शनिवार
पाथर्डी तालुक्यातील लोहसर खांडगाव येथील तरुणाने दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत केले नाही, म्हणुन झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या मारहाणीच्या घटनेत मयत झालेल्या तरुणाचे नाव सुदाम विक्रम गिते (वय ३७) असे आहे. याप्रकरणी दोघांजणांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पाथर्डी तालुक्यातील लोहसर खांडगाव येथील तरुण सुदाम विक्रम गिते याने दारू पिण्यासाठी उधारीने पैसे घेतले होते.मात्र अनेक दिवसानंतरही सुदाम हा आपले उधारीने घेतलेले पैसे देत नसल्याने आरोपी दत्तात्रय भाऊसाहेब वांढेकर व किरण सखाराम वांढेकर (दोघे रा. लोहसर खांडगाव,ता.पाथर्डी) या दोघांनी सुदाम यास लाथाबुक्क्यांनी पोटात, छातीवर, खांद्यावर मारहाण केली. या झालेल्या मारहाणीत सुदाम गिते हा मयत झाला. याबाबत मयत सुदाम याचा भाऊ आदिनाथ विक्रम गिते (वय ४२, रा. लोहसर खांडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय भाऊसाहेब वांढेकर व किरण सखाराम वांढेकर यांच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक परमेश्वर जावळे हे करत आहेत.