पाथर्डी तालुक्यातील 'या' लसीकरण केंद्रावर लस घेण्याअगोदर नागरिकांची घेतली कोरोना चाचणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 17 मे 2021, सोमवार
पाथर्डी शहरातील लसीकरण केंद्रावर लस देण्याअगोदर कोरोना चाचणी येणाऱ्या नागरिकांची केली जात आहे.
पाथर्डी- कोरोना चाचणीमुळे लसीकरण केंद्रावर लोकांची गर्दी कमी होताना दिसत आहे. लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची रॅपिड चाचणी करण्यास सुरवात केले आहे. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी पाहता तालुका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. काल, रविवारी केलेल्या चाचण्यांमध्ये एक महिला कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाली आहे. लस टोचून घेण्यासाठी कोरोना चाचणी होते, हे पाहता बऱ्याच जणांनी लसीकरण केंद्रावरून काढता पाय घेतला. पाथर्डी शहरातील मेनरोडवरील जिल्हा परिषद शाळेत लस देण्यात येत आहे.
लसीचा कमी पुरवठा त्यात लस घेण्याची घाई असे चित्र आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्रावर लोकांची गर्दी आणि गोंधळ उडतो. यासर्व प्रकारात लसीकरण केंद्रावर पॉझिटिव्ह व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येऊन कोरोनाचा प्रसार करतो. त्यामुळेच कोरोना चाचणी लसीकरण केंद्रावर सुरु करण्यात आली आहे. यातून गर्दीला आळा बसेल व पॉझिटिव्ह व्यक्ती वेळेवर सापडणार आहे. कोरोना संशयित असलेल्या व्यक्ती या चाचणीच्या धास्तीने लस घेण्यास केंद्रावर जात नाही. प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक कराळे, पालिकेचे मुख्याधिकारी धंनजय कोळेकर हे लसीकरण केंद्रावर नियोजन करीत आहे.