माणिकदौंडी येथे पंचक्रोशी कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन
By Admin
माणिकदौंडी येथे पंचक्रोशी कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन
नगर सिटीझन- पाथर्डी प्रतिनिधी -
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील श्री रत्न जैन विद्यालय येथे माणिकदौंडी पंचक्रोशी कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन सोमवार दि. १७ मे रोजी करण्यात आले.
माणिकदौंडी येथे लोकसहभागातून माणिकदौंडी पंचक्रोशी कोवीड सेंटरचे उद्घाटन रूपलाचातांडा चे निवृत्त सहायक निबंधक कुंडलिक राठोड यांच्या हस्ते आणि प्रांताधिकारी देवदत्त केकाण व तहसीलदार शाम वाडकर यांचे उपस्थितीत करण्यात आले.
मागील वर्षापासून माणिकदौंडी परिसरातील नागरिक कोरोनाशी लढता-लढता मेटाकुटीला आले होते. या परिसरात रुग्णांची उपचाराची सोय नव्हती. तसेच कोरोना च्या दुसऱ्या लाटेत खेड्या-पाड्यात, वाड्यावस्त्यांवर, तांड्यावर कोरोना ची वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक होती. या परिसरातील रुग्णांना पाथर्डी तालुक्याच्या वेगवेगळ्या कोवीड सेंटर मध्ये ऍडमिट व्हावे लागायचे. त्यातच काही सेंटरमध्ये बेड शिल्लक नाही, ऑक्सीजन नाही अशी गैरसोय व्हायची. या बाबींचा विचार करून माणिकदौंडी गावचे उपसरपंच समीर पठाण व माणिकदौंडी सजाचे तलाठी राजेंद्र मेरड यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून माणिकदौंडी येथे कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
कोवीड सेंटर उभारण्याच्या कामी निवृत्त सहाय्यक निबंधक कुंडलिक राठोड यांनी ५० हजार रुपये, माणिकदौंडी मेडिकल असोशियन ५१ हजार रुपये, उपसरपंच समीर पठाण २५ हजार रु.,आल्हनवाडी सरपंच मनीषा कर्डिले २५ हजार रू., चितळवाडी सरपंच संजय चितळे ११ हजार रु., आल्हणवाडी उपसरपंच परमेश्वर गव्हाणे ५ हजार रुपये, शिरसाटवाडी सरपंच अविनाश पालवे यांचे कडून एक क्विंटल साखर आणि ५० बिसलरी बॉक्स अशी देणगी देऊन या सर्वांनी खूप मोलाचे सहकार्य केले आहे.
तसेच कोवीड सेंटर साठी शुद्ध पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत सदस्य रमीज पटेल व चहा पाण्याची व्यवस्था प्रा. सुनिल पाखरे यांनी केली. माणिकदौंडी येथील सर्व किराणा व्यवसायिक व परिसरातील स्वस्त धान्य दुकानदारांनीही या कामात मदत केली आहे.
या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती गटविकास अधिकारी शितल खिंडे, आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, पंचायत समिती गटनेते सुनिल ओव्हाळ, शिवाजी मोहिते, परिसरातील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
दरम्यान माणिकदौंडी येथे उभारण्यात आलेल्या कोवीड सेंटरला परिसरातील नागरिकांनी शक्य होईल तेवढी मदत देणगी स्वरूपात द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

