आमदार मोनिका राजळे यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरु
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 10 मे 2021
पाथर्डी- शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे कोरोना संसर्गाने बाधीत असल्याने ५ मे पासून त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मागील महिन्यात २१ ते २३ एप्रिल दरम्यान कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठका कार्यक्रम तसेच पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील कोविड सेंटरच्या उभारणीसाठी झालेल्या धावपळी दरम्यान त्या कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने २४ एप्रिल पासून होम क्वारंटाइन होत्या.
यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीस सुद्धा त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. याच दरम्यान पाथर्डी व शेवगाव येथे सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेन्टरच्या कार्यक्रमासही त्या अनुउपस्तीत होत्या.परंतु या कालावधीत त्या शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गा संदर्भात प्रशासन व आरोग्य विभागाशी सातत्याने संपर्कात होत्या.
घरी उपचार घेत असतांना त्रास वाढल्याने त्यांना ४ मे रोजी नगर येथील खाजगी रुग्णालयात तर ५ मे रोजी त्यांना मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु असून उपचारासाठी त्यांची प्रकृती योग्य साथ देत असल्याचे त्यांचेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.