महाराष्ट्र
मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आयोग घेणार विद्यार्थ्यांची
By Admin
Election : मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आयोग घेणार विद्यार्थ्यांची मदत; असा असेल उपक्रम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यानंतर आता महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांकडून उमेदवार यादी येण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीने अपेक्षित लक्ष्य गाठले नव्हते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही असे घडू नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण विभागाच्या मदतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी संकल्प पत्र उपक्रम आयोजित केला जात आहे. (The Election Commission will take the help of students to bring the voters to the polling station)
संकल्प पत्र या उपक्रमांतर्गत शिक्षण विभाग शालेय विद्यार्थ्यांमार्फत पालकांना एक पत्र पाठवणार आहे. या पत्राद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसतील. संकल्प पत्रामध्ये विद्यार्थी पालकांना म्हणताना दिसतील की, 'मला ठाऊक आहे की, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र परिश्रम करता. परंतु माझे भविष्य लोकशाहीशी जोडलेले आहे. म्हणूनच मी तुम्हाला संकल्प आता करायला लावणार आहे…' असा मजकूर असलेले पत्र येत्या काही दिवसांत पालकांकडे पोहचणार आहे. यानंतर पालकांनीही असेच संकल्प पत्र भरून पुन्हा विद्यार्थ्यांना पाठवायचे आहे.
पालकांना नमूद करावे लागेल की, आम्ही असा संकल्प करतो की, आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निष्पक्षपाती, शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखू. तसेच या निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा आदींच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. याशिवाय आमच्या कुटुंबातील सर्व मतदार, शेजारी आणि मित्रपरिवार यांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करू.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढील महिन्यात 20 नोव्हेंबर रोजी म्हणजेच बुधवारी महाराष्ट्रातील मतदानाची तारीख निश्चित केली आहे. परंतु निवडणूक आयोगाने बुधवारीच मतदानाची तारीख का निवडली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. यामागचे कारण आता समोर आले आहे. ते म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी शनिवार-रविवारला मतदानाचा दिवस जोडून आल्याने अनेकांनी मतदाना करण्याऐवजी फिरायला जाणे पसंत केलेहोते. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचे पाहायला मिळाले होते. विधानसभा निवडणुकीतही असे होऊ नये यासाठी मतदानाचा दिवस बुधवार निश्चित करण्यात आला आहे. मधला दिवस असल्याने मतदार फिरायला न जाता मतदान केंद्रावर येतील, अशी अपेक्षा निवडणूक आयोगाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Tags :
97023
10