आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दादापाटील राजळे
By Admin
मा.आ.आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दादापाटील राजळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, विद्यार्थी कल्याण मंडळ व प्लेसमेंट सेलचे उद्घाटन उत्साहात संपन्न
पाथर्डी- प्रतिनिधी
आदिनाथनगर ता. पाथर्डी : श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा श्री वृद्धेश्वर स. सा. कारखान्याचे अध्यक्ष आमदार मा. आप्पासाहेब राजळे पा. (काका) यांच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त दादापाटील राजळे महाविद्यालयात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप तसेच विद्यार्थी कल्याण मंडळ आणि प्लेसमेंट सेल विभागाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मा. श्री. राहुलदादा राजळे यांनी आदरणीय आप्पासाहेब राजळे तथा काकांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना सर्वसमावेशक आणि समाजाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक असल्याचे सांगितले. काकांनी शिक्षण, सामाजिक विकास आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य घटकांच्या उन्नतीला आपल्या कार्याच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करण्याची त्यांची कार्यपद्धती पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. आदरणीय काकांनी शिक्षण क्षेत्राला दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि शिक्षणातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. ‘शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्याचे माध्यम आहे’, या व्यापक दृष्टिकोनातून संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे यावेळी राहुल राजळे यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी काकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काकांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून ज्ञान, संस्कार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी समाजाच्या विकासाला नवी दिशा दिली आहे. काकांचे दूरदर्शी नेतृत्व, विद्यार्थीहिताची तळमळ आणि समाजाभिमुख कार्यपद्धती ही संस्थेच्या प्रगतीची प्रेरणादायी शक्ती आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
काकांचे अभिष्टचिंतन करताना ज्येष्ठ नेते मा. श्री. उद्धवराव वाघ यांनी काकांसोबतच्या दीर्घ राजकीय व सामाजिक सहप्रवासातील आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले “काकांसोबतचा राजकीय व सामाजिक प्रवास हा संघर्ष, विश्वास आणि समाजसेवेच्या असंख्य आठवणींनी समृद्ध आहे; या प्रवासात आम्ही अनेक चढ-उतार एकत्र अनुभवले. सर्वसामान्य माणसाच्या सुख-दुःखात धावून जाण्याची आणि कार्यकर्त्यांना सदैव बळ देण्याची काकांची भूमिका आजही तितकीच प्रेरणादायी आहे. दीर्घकाळाच्या या सहप्रवासात काकांनी जपलेली माणुसकी, मैत्री आणि समाजहिताची बांधिलकी हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे.”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. श्री. रामदास म्हस्के सर होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री म्हस्के म्हणाले “काका माझे बालपणीचे मित्र असून, आयुष्यभर त्यांनी जपलेली माणुसकी, साधेपणा आणि सर्वसमावेशक विचारसरणी त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे. शिक्षण, समाजसेवा आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी असून, समाजाला दिशा देणारे आहे. त्यांचे नेतृत्व हे केवळ पदापुरते मर्यादित नसून, माणसे जोडणारे आणि समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारे आदर्श समाजाभिमुख नेतृत्व आहे.”
श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे विश्वस्त मंडळाच्या सर्व सदस्यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. मा. श्री. राहुलदादा राजळे यांच्या शुभहस्ते विद्यार्थी कल्याण मंडळाचे व प्लेसमेंट सेलचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यास या मंडळाच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळवून देण्यासाठी हे मंडळ महत्त्वाची भूमिका बजावेल. प्लेसमेंट सेलमुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासोबतच करिअर नियोजन आणि रोजगाराच्या संधींची दिशा मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच गुणवत्तापूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या कार्यक्रमास श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य, तसेच विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र इंगळे व डॉ. किशोर गायकवाड यांनी केले तर आभार प्राचार्य अशोक काळे यांनी मानले.
22826
10




