महाराष्ट्र
मतदानाचा हक्क बजावणे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य-
By Admin
मतदानाचा हक्क बजावणे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य- नोडल अधिकारी रामनाथ कराड
श्री तिलोक जैन विद्यालयात मतदार जनजागृती अभियान
पाथर्डी प्रतिनिधी:
जगामध्ये भारत हे सर्वात मोठे लोकशाही प्रधान राष्ट्र आहे. या मध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदान या अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत.सक्षम लोकशाहीच्या बळकटीसाठी, योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे, त्यामुळे येणाऱ्या शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. जिल्हा अधिकारी यांनी घोषित केलेले मिशन ७५ टक्के पेक्षा अधिक मतदान प्रत्येक केंद्रावर व्हावे यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांसह समाजात जनजागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मतदान जनजागृति मोहिमेचे नोडल अधिकारी रामनाथ कराड यांनी केले.शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात मतदार जनजागृती अभियान प्रसंगी ते बोलत होते.
शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी प्रसाद मते व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उध्दव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात मतदान जनजागृती मोहिम अंतर्गत तालुक्यांत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती कराड यांनी दिली.यावेळी व्यासपीठावर श्री तिलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड, पर्यवेक्षक दिलावर फकीर, सुधाकर सातपुते,मतदान जनजागृती अभियानाचे सदस्य भारत गाडेकर, बिपिन खंडागळे, अतुल तरवडे, संतोष घोगरे, बाळासाहेब मरकड, राजेंद्र चव्हाण, गहिनीनाथ शिरसाट उपस्थित होते. या जनजागृती अभियानाच्या निमित्ताने विद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले. या मध्ये मतदान जनजागृती पर रांगोळी स्पर्धा ,निबंध स्पर्धा इ. चे आयोजन करण्यात आले.यावेळी शाहीर भारत गाडेकर यांनी मतदान जागृती करण्याच्या दृष्टीने मतदार गीत सादर केले तसेच बिपिन खंडागळे यांनी काव्यवाचन करून मतदान करण्याबाबतची प्रतिज्ञा सामुहीक रूपात दिली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती अभियान राबवण्याबाबतची संकल्प पत्रे सादर केली. तसेच निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाची प्रसिद्धी प्रमुख म्हणून संतोष घोगरे यांनी जबाबदारी पार पाडली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अशोक दौड यांनी केले तर सूत्रसंचालन सुनिल कटारिया यांनी करून आभार पर्यवेक्षक दिलावर फकीर यांनी मानले.
Tags :
125815
10