महाराष्ट्र
पत्नीच्या तक्रारीवरुन पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा!
By Admin
पत्नीच्या तक्रारीवरुन पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा!
फसवणूक केल्याप्रकरणी सासू-सासर्यासह नणंद-नंदोई विरोधातही गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गुन्हेगारी घटनांचा दिवस ठरलेल्या बुधवारी आणखी एक धक्कादायक वृत्त येवून धडकले आहे. मुलाचे पहिले लग्न झालेले असतांनाही त्याची माहिती लपवून केलेले दुसरे लग्न आणि आपल्या इच्छेविरोधात ठेवलेल्या शारीरिक संबंधाच्या कारणावरुन एका 32 वर्षीय विवाहितेने आपल्या पतीसह सासू-सासरे व नणंद-नंदोईच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी अत्याचारासह फसवणूक केल्याप्रकरणी वरील पाचही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पत्नीकडून पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना असल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरानजीकच्या कासारवाडी शिवारातील एका 32 वर्षीय तरुणीने याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मे 2018 मध्ये सदर तरुणीचा नाशिक येथील विशाल उत्तम उबाळे या तरुणाशी विवाह झाला होता. मुलगी पहाण्यासाठी आलेल्या मुलाच्या आई, वडील, बहीण व मेव्हण्याने मुलाचे पहिले लग्न झाल्याची माहिती मात्र लपवून ठेवली होती. दोन्ही कडच्या मंडळींच्या संमतीने मुला-मुलीच्या पसंदीने विवाहही झाला. मात्र त्याचवेळी सदर तरुणीने आपले शिक्षण सुरु असल्याने ते पूर्ण झाल्याशिवाय शारीरिक संबंधास विरोध केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत सदर तरुणाने लग्नानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही वेळोवेळी त्या तरुणीच्या विरोधाला न जुमानता त्याने तिच्याशी संबंध ठेवले.
त्यासाठी कल्याण येथे असताना मुलाची बहीण व मेव्हण्याने ‘त्या’ विवाहितेवर दबाव आणून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यातून तिच्या पोटात गर्भ राहून एका मुलीचाही जन्म झाला. या दरम्यान सदर मुलाचा पहिला विवाह झाल्याची माहिती पीडितेला समजली, त्यातूनच आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर तिने थेट आपले माहेर गाठले. घडला प्रकार आणि झालेली फसवणूक तिने आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर त्यांनी या प्रकरणी न्याय मिळविण्यासाठी कायद्याचा आधार घेण्याचे ठरविले. त्यानुसार बुधवारी (ता.29) सायंकाळी सदर विवाहितेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दाखल केली आहे.
त्यावरुन पोलिसांनी सदर तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे व पहिल्या लग्नाची माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी तिचा पती विशाल उत्तम उबाळे, त्याचे वडील उत्तम गोपाळ उबाळे, आई निर्मला उत्तम उबाळे (तिघेही रा.नाशिक), त्याची बहिण वंदना विजय गायकवाड व तिचा पती विजय तुकाराम गायकवाड या सर्वांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 व फसवणूक केल्याचे कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे
पत्नीने आपल्या पतीनेच आपल्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच घटना असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणाची व्याप्ती नाशिक व कल्याणपर्यंत असल्याने अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा सखोल तपास करुन लवकरच आरोपींना गजाआड करणार असल्याचे तपासी अधिकार्यांनी सांगितले.
Tags :
834
10